ब्रेकींग न्युज - गायीचे डोहाळे जेवण! ओटी भरणे कार्यक्रमा चर्चा.. कोठे वाचा सविस्तर - चंदगड लाईव्ह न्युज

19 December 2021

ब्रेकींग न्युज - गायीचे डोहाळे जेवण! ओटी भरणे कार्यक्रमा चर्चा.. कोठे वाचा सविस्तर

कालकुंद्री (ता. चंदगड) येथे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करताना शेतकरी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

       कालकुंद्री (ता. चंदगड) येथील प्रभाकर भावकू कोकितकर व त्यांची पत्नी सौ सुनिता या दाम्पत्याने पाळलेल्या गीर जातीच्या गाय- पाडीचे पहिले डोहाळे जेवण मोठ्या उत्साहात करण्यात आले.  गावपुरोहित व शेकडो महिला, ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेला विधिवत कार्यक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. 

        प्रभाकर यांनी दीड वर्षाची असताना ही पाडी कर्नाटक मधील कल्लेहोल (ता. बेळगाव) येथून सोळा हजार रुपये मध्ये खरेदी केली होती. दोन वर्षांनंतर प्रथमच गाभण राहिल्यामुळे आनंदित झालेल्या कोकितकर कुटुंबीयांनी तिचे डोहाळे जेवण मोठ्याने करायचा निश्चय केला होता. तो नुकताच प्रत्यक्षात उतरवला. नखशिखांत सजवलेल्या गाईचे महिलांनी खणा-नारळाने ओटी भरून औक्षण केले. तिला पौष्टिक फळे खाण्यास दिली. वैशिष्ट्य म्हणजे एवढ्या गर्दी व गोंधळाच्या वातावरणात सुद्धा ती कार्यक्रम संपेपर्यंत स्थितप्रज्ञ सारखी उभी होती. कार्यक्रमानंतर उपस्थित शेकडो ग्रामस्थांना गोडाचे जेवण देण्यात आले.

                                                 जाहिरात
जाहिरात

            हिंदू धर्मात गाईला माता तसेच तिच्या शरीरात देवांचे वास्तव्य असल्याचे मानले जाते. तिच्या गोमुत्राला आयुर्वेदात औषधाचा मान असल्यामुळे विविध रोगात त्याचा वापर केला जातो. प्रभाकर कोकितकर हे कुटुंबीय गरजू रुग्ण व धार्मिक विधी साठी आनंदाने गोमूत्र जमा करून देत असतात. या गिर गायीचे मूत्र अन्य वेळीही वाया न जाऊ देता ते साठवून विविध पिकांवर औषध, कीटकनाशक तसेच टॉनिक म्हणून फवारणी केली जाते. यामुळे पिकांचा पोत व दर्जा सुधारण्यास मदत झाली आहे. असेही प्रभाकर यांनी यावेळी सांगितले.

        शेतीला पूरक व्यवसाय म्हणून असलेला दुग्ध व्यवसाय सध्या शेतकऱ्यांसाठी मुख्य व्यवसाय बनला आहे. त्यामुळे गाय, म्हैस, शेळी पालनाकडे शेतकरी जाणीवपूर्वक वळला आहे. या पार्श्वभूमीवर कोकितकर कुटुंबीयांनी गायीच्या डोहाळे जेवणाचा उपक्रम चर्चेत आला आहे. यानिमित्त प्रभाकर कोकितकर दाम्पत्याचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment