कोल्हापूर येथील शिक्षण संचालक कार्यालयासमोर प्राणांकित उपोषणाला बसलेले हिंदुराव जाधव , संजय गुरव व शिक्षक
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
कोल्हापूर येथील शिक्षण उपसंचालक विभागीय कार्यालयाच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या सातारा , सांगली , कोल्हापूर , रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी नियमबाह्यपणे कायद्याचे उल्लंघन करुन बेकायदेशीरपणे दिलेल्या पर्यवेक्षक उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापक पदांच्या मान्यता तात्काळ रद्द कराव्यात या प्रमुख मागणी प्राणांतिक उपोषण कोल्हापूर येथील विभागीय संचालक कार्यालयासमोर आज सुरू करण्यात आले . खाजगी बीएड नियुक्त माध्यमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक आज प्राणांकित उपोषणास बसले आहेत .
शिक्षण संचालक , शिक्षण संचालनालय , महाराष्ट्र राज्य , पुणे -१ यांनी पारित केलेल्या सेवाज्येष्ठता मार्गदर्शन पत्रानुसार खाजगी शिक्षण संस्थांच्या सेवाज्येष्ठता यादी तयार करुन पदोन्नतीची प्रक्रिया व्हावी . तसेच इतर अनेक मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्याच्या बी.एड. नियुक्त माध्यमिक शिक्षक संघाने आज सोमवार दि . २४ जानेवारी २०२२ रोजी प्राणांतिक उपोषणास सुरवात केली . राज्यातील खाजगी अनुदानित शिक्षणसंस्थांच्या माध्यमिक उच्चमाध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक , उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक या पदोन्नतीच्या पदावर प्रवर्ग ' क ' मधील सेवाज्येष्ठतेनुसार सेवाज्येष्ठ माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती करणे , सेवा शर्ती कायदा व नियमावलीस अनुसरुन आहे . पण तरीही संस्थाचालक आणि शिक्षण विभागातील अधिका - यांच्या संगनमताने नियमबाह्य , बेकायदेशीरपणे केलेल्या नियुक्त्या आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या मान्यता हा गेल्या काही वर्षातील वादाचा विषय ठरला आहे . त्यामुळे राज्यातील अनेक शाळांमध्ये माध्यमिक शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेवरुन वाद निर्माण झाले आहेत . परिणामी शाळांमधील दैनंदिन कामकज , गुणवत्ता व शिस्त या बाबींवर दुरगामी परिणाम होत असल्याचे आढळून येत आहे . यावर कायमस्वरुपी मार्गदर्शन आणि निर्णयप्रणाली तयार होण्यासाठी सर्वोच्य न्यायालयातील अनेक न्यायनिवाडे , निर्णय तसेच शाळा सेवा शर्ती कायद्यातील तरतुदींचा साकल्याने विचार करुन राज्याच्या शिक्षण आयुक्तांच्या निर्देशानुसार मा . शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे -१ यांनी माध्यमिक शिक्षकांची सेवाज्येठता निर्धारीत करण्यासाठी मार्गदर्शनपर परिपत्रक राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) व शिक्षण उपसंचालकांना पाठविले आहे .
तरी या सेवाज्येठता मार्गदर्शन पत्राला तसेच कायदा , नियमावलीस डावलून पदोन्नतीमध्ये चुकीच्या नियुक्त्या आणि अधिका - यांनी दिलेल्या पदोन्नतीच्या मान्यता या गंभीर चूका आहेत . त्यामुळे दिलेल्या या पदोन्नती आणि मान्यता तात्काळ रद्द कराव्यात . आणि दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय , पुणे यांनी दिलेल्या आदेशाची तात्काळ अंमलबाजवणी करावी ही प्रमुख मागणी प्राणांतिक उपोषण आंदोलनाची आहे . या मागणी बरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेच्या सुसनावणीचा नियमबाह्य पध्दतीने दिलेला निर्णय तात्काळ रद्द करुन शिक्षण आयुक्त शिक्षण संचालक यांच्या मार्गदर्शन पत्रानुसार निर्णय देण्यात यावा . माध्यमिक शाळांमधील सेवाज्येष्ठतेबाबत शिक्षण संचालनालयाच्या दि . २२/११/२०२१ रोजीच्या परिपत्रकानुसार काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे सक्त आदेश विभागातील सर्वच शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) यांना देण्यात यावेत . आदि मागण्या या प्राणांतिक उपोषण आंदोलनाच्या आहेत . बी . एड . नियुक्त माध्यमिक शिक्षक संघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष हिंदुराव जाधव , राज्य कार्यकारिणी सदस्य संजय गुरव , विजय तलबार , मधुकर कोकणी , रवींद्र खैरे , अनंतकुमार मोघे यांच्यासह सौ . अश्विनी कांबळे , मोहन कांबळे , जितेंद्र कांबळे , सुयोग कांबळे उपोषणास बसले आहेत तर चंदगड तालूक्यातून एस .डी. पाटील , एस .के. पाटील , एम.वाय. कांबळे , बी .बी. नाईक , एस .आर. निळकंठ आदि शिक्षकानी आंदोलन स्थळी येऊन आंदोलनास पाठींबा दिला .दरम्यान संघटनेचे उपाध्यक्ष हिंदुराव जाधव , संजय गुरव , एस .के. पाटील यांच्या शिष्टमंडळाने शिक्षण सहसंचालक शुभाष चौगुले यांच्याशी चर्चा केली . पण ती निष्फळ ठरल्याने आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment