यशवंतनगर येथे बिबट्याचा वावर, नागरिकांत भीतीचे वातावरण, वनविभागाकडुन गस्त सूरू - चंदगड लाईव्ह न्युज

28 January 2022

यशवंतनगर येथे बिबट्याचा वावर, नागरिकांत भीतीचे वातावरण, वनविभागाकडुन गस्त सूरू

बिबट्याचे  संग्रहित छायाचित्र

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      यशवंतनगर - तुर्केवाडी येथे बिबट्याचा वावर दिसून आल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाकडुन या परिसरात गस्त सुरू असून नागरिकानी सावधानता बाळगावी असे आवाहन  वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे यांनी केले आहे. 

बिबट्याच्या पायाचे टसे

      गुरुवार दि. २७ जानेवारी रात्री आठच्या सुमारास यशवंतनगर येथील फास्कल फर्नांडिस यांच्या घराबाहेर काही नागरिकांना बिबट्या निदर्शनास आला. काल याच परिसरात फर्नांडिस यांचा मुलगा कुत्र्याला फिरायला घेवून गेला असता पाटील यांच्या शेतात असलेल्या घराच्या कट्ट्यावर बिबट्या बसल्याचे दिसून आला होता. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर यशवंतनगर येथील चव्हाण मळा, पाटील तसेच अरुण पवार यांच्या शेतात वाघाचे ठसे आढळून आले होते. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी येवून पाहणी करून गेले होते. या ठशावरून हा बिबट्या असल्याचा अंदाज असून परिसरात बिबट्याचा वावर आणि अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. तो मानवी वस्तीत घुसला असल्याने याबाबत वनविभागाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे उपसरपंच अरुण पवार यांनी सांगितले.

        याबाबतची माहिती मिळताच यशवंतनगर परिसरात वन खात्याचे कर्मचारी  पेट्रोलिंग करत आहेत. तसेच यशवंतनगर परिसरातील सर्व गावच्या गणेश मंडळ, ग्रामपंचायत यांना याबाबतची माहिती देण्यात आलेले असून व शिनोळी व पाटणे एमआयडीसीतील सर्व कंपनीच्या मॅनेजर यांना बिबट्या आल्याची सूचना रात्र पाळीस येणाऱ्या कामगारांना देण्यात यावी असे सूचित करण्यात आलेले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सतर्क राहात काळजी घेण्याचे आवाहन चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment