२५ रोजी सर्व मतदान केंद्रांवर 'राष्ट्रीय मतदार दिन' साजरा करावा - तहसीलदार विनोद रणवरे - चंदगड लाईव्ह न्युज

21 January 2022

२५ रोजी सर्व मतदान केंद्रांवर 'राष्ट्रीय मतदार दिन' साजरा करावा - तहसीलदार विनोद रणवरे

मतदानाचे संग्रहित छायाचित्र

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

      कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा '१२ वा राष्ट्रीय मतदार दिन' कोविड ची आचारसंहिता पाळून विविध उपक्रमांनी साजरा करावा, असे आवाहन चंदगडचे तहसीलदार विनोद रणवरे यांनी केले. ते दि. २१ रोजी मतदार नोंदणी पर्यवेक्षकांच्या ऑनलाईन बैठकीत मार्गदर्शन करत होते. सचिन सुरेश आखाडे (निवडणूक नायब तहसीलदार) उपस्थित होते.

    २५ जानेवारी २०२२ रोजी १२ वा राष्ट्रीय मतदार दिवस राज्य, जिल्हा व मतदान केंद्र स्तरावर साजरा करण्याबाबतच्या सूचना निवडणूक आयोग, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कडून देण्यात आल्या आहेत. या दिवशी कोविड आचारसंहितेचे पालन करून मतदारांना शपथ देणे.  मतदान केंद्रावर नवमतदारांना फोटो ओळखपत्र देऊन त्यांचे स्वागत करणे. दिव्यांग, वृद्ध नागरिक, महिला, तृतीयपंथी व्यक्ती, उपेक्षित घटकातील व्यक्तींना कार्यक्रमात सामावून घेणे, त्यांना निवडणूक आयकॉन म्हणून पुढे येण्यास प्रेरित करणे, वोटर हेल्पलाइन ॲप व इतर सुविधांची माहिती देणे, जिल्हा तसेच राज्यस्तरीय आयकॉन व्यक्तींचे व्हिडिओ संदेश दाखवणे, मतदारांना त्यांच्या हक्क व कर्तव्याची जाणीव करून देणे. अशा प्रकारचे उपक्रम प्रत्येक केंद्रस्तरावर राबविण्यात येणार आहेत. 

          गावातील विविध संस्था स्वयंसेवी संस्था व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी तहसीलदार रणवरे यांनी केले. याकामी गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांचे मार्गदर्शन लाभले. ऑनलाइन व्ही. सी. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निहाल मुल्ला यांनी परिश्रम घेतले. यावेळी चंदगड तालुक्यातील सर्व पर्यवेक्षक ऑनलाइन उपस्थित होते.

            राष्ट्रीय मतदार दिनी मतदारांनी घ्यावयाची 'शपथ'-

             "आम्ही भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू. प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे कोणत्याही प्रलोभनांस बळी न पडता मतदान करू."

No comments:

Post a Comment