'बारी' वरील 'सबुद' महानाट्यातील गीते झाली संगीतबद्ध! नाट्यरसिकांची उत्सुकता शिगेला - चंदगड लाईव्ह न्युज

29 January 2022

'बारी' वरील 'सबुद' महानाट्यातील गीते झाली संगीतबद्ध! नाट्यरसिकांची उत्सुकता शिगेला

 सबुद नाटकातील गीते संगीतबद्ध प्रसंगी गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक, पार्श्वगायक, गायिका

कालकुंद्री / सी. एल. वृत्तसेवा

    'श्रीमान योगी', 'स्वामी'कार पद्मश्री स्व. रणजित देसाई लिखित एकेकाळी तुफान गाजलेल्या 'बारी' कादंबरीवर आधारित  'सबूद' हे महानाट्य डोंबिवली, मुंबई येथे आकाराला येत आहे. नाटकाच्या रंगीत तालीम पाठोपाठ यातील गीते नुकतीच मुंबई येथे संगीतबद्ध करण्यात आली.

    'चंदगडी' गीतकार शिवाजी विष्णू पाटील (नागरदळे) लिखित अविस्मरणीय गीतांना संगीत साज चढवला आहे. संगीतकार विशाल बोरूले  यांनी. विजय बोराडे, डॉ नेहा राजपाल, संचिता मोरस्कर या पार्श्व गायक, गायिकांनी आपल्या सुमधुर आवाजाच्या जादूने गीते जिवंत केली आहेत. पार्शसंगीत आहे आनंद कुबल यांचे. गीतांच्या रेकॉर्डिंग प्रसंगी दिग्दर्शक जीवन कुंभार, निर्माता शिवाजी वि.पाटील व संजय कृ. पाटील, उद्योजक सत्तूराम मणगुतकर, नाट्यलेखक सन्ना मोरे, सबुद महानाट्यात भूमिका साकारणारे कलावंत व हितचिंतकांची उपस्थिती होती. 

        मुंबईस्थित चंदगड तालुक्यातील विविध गावच्या चाकरमानी कलाकारांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या 'नाट्यसंस्कार' संस्था निर्मित 'सबूद' महानाट्याला रणजित देसाई यांच्या कन्या पारू नाईक, मधुमती शिंदे, नातू गौरव नाईक व कुटुंबीयांनी शुभेच्छा दिल्या आहेत. रणजीत दादांच्या साहित्यावर प्रेम करणारे वाचक व मराठी नाट्य रसिकांना हे महानाट्य रंगभूमीवर पाहण्याची  मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. नाटकाचा पहिला प्रयोग चंदगड तालुक्यात मार्च किंवा एप्रिल महिन्यात सादर करण्याचा मनोदय नाट्यसंस्कार मंडळाच्या वतीने दिग्दर्शक जीवन कुंभार यांनी यावेळी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment