चंदगड तालुक्यात १९८ केंद्रांवर 'राष्ट्रीय मतदार दिन' उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

25 January 2022

चंदगड तालुक्यात १९८ केंद्रांवर 'राष्ट्रीय मतदार दिन' उत्साहात

  राष्ट्रीय मतदार दिवस अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व नवमतदारांना नवीन ओळख पत्र वाटप करताना तहसीलदार विनोद रणवरे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड तालुक्यातील १९८ मतदान केंद्रांवर आज २५ जानेवारी रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविडची आचारसंहिता पाळून विविध उपक्रमांनी १२ वा 'राष्ट्रीय मतदार दिन' उत्साहात साजरा साजरा करण्यात आला.

        चंदगड येथील तहसील कार्यालयात तहसीलदार विनोद रणवरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात र. भा. माडखोलकर महाविद्यालय, धनंजय विद्यालय व गुडेवाडी विद्यालयातील विद्यार्थी  स्वयंसेवकांच्या सहभागाने पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी  लोकशाही समाजव्यवस्थेत मतदार व मतदान यांचे महत्व सांगण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार सचिन सुरेश आखाडे, प्रा. एस. एन. पाटील, प्रा. व्ही. के. गावडे, व्हि. के. फगरे, नदाफ, माजी जि. प. शिक्षण सभापती भरमाणा गावडे, तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. नगरपंचायत चंदगड येथे आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रम प्रसंगी नगराध्यक्षा प्राची काणेकर यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

       याशिवाय चंदगड तालुक्यातील १९८ मतदान केंद्रांवर १९८ केंद्रस्तरीय मतदान अधिकारी तथा बी. एल. ओ. व २० पर्यवेक्षक यांच्या माध्यमातून मतदार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व केंद्रांवर मतदारांचे स्वागत, मतदान ओळखपत्रांचे वाटप करुन मतदारांना शपथ देण्यात आली. मतदान प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पाडणे, मतदानासाठी कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपल्या अधिकाराचा वापर करण्याबद्दल मतदारांचे उद्बोधन करण्यात आले. याकामी गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक आंबी (महसूल शाखा) व निहाल मुल्ला यांचेसह निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

No comments:

Post a Comment