खड्डेमय कोवाड- कागणी रस्त्यामुळे वाहनधारक त्रस्त, तात्काळ दुरुस्तीची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

24 January 2022

खड्डेमय कोवाड- कागणी रस्त्यामुळे वाहनधारक त्रस्त, तात्काळ दुरुस्तीची मागणी

 खड्डेमय कोवाड- कागणी रस्त्यामुळे वाहनधारक त्रस्त तात्काळ दुरुस्तीची मागणी 

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

        कोवाड- कागणी, बेळगाव रस्ता खड्डेमय बनला आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांनी त्रस्त झालेल्या प्रवासी व वाहनधारकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे.

   गडहिंग्लज, आजरा, नेसरी, माणगाव, कामेवाडी भाग बेळगावशी जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. या मार्गावर कोवाड ते कागणी या तीन किलोमीटर टप्प्यात गेल्या तीन ते चार महिन्यात पडलेल्या खड्ड्यांनी आता रौद्र रूप धारण केले आहे. खड्ड्यांची ही मालिका चुकवण्याच्या नादात छोटे-मोठे अपघात व वादावादीचे प्रसंग घडताना दिसत आहेत. सायंकाळी अंधार पडल्यानंतर वेगवान वाहने व वाहनधारकांना याचा अधिक फटका बसताना दिसत आहे. 

         या मार्गावरून तालुक्यातील तीन व बेळगाव परिसरातील साखर कारखान्यांकडे होणारी ऊस वाहतूक व इतर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. या तीन किलोमीटर पट्ट्यात गडहिंग्लज, आजरा, नेसरी, माणगाव- निट्टूर, कामेवाडी- दुंडगे, ढोलगरवाडी- कडलगे- किणी या मार्गांसह दड्डी, राजगोळी, कुदनूर, कालकुंद्री अशा पाच मार्गावरील वाहनांची वर्दळ असते. नेसरी ते उचगाव (कर्नाटक) दरम्यान सर्वाधिक वर्दळीचा हा भाग आहे. बांधकाम विभागाने तात्काळ चांगल्या दर्जाचे पॅचवर्क करून संभाव्य अपघात टाळावेत अशी मागणी वाहनधारक व प्रवासी वर्गातून होत आहे.

No comments:

Post a Comment