सुर्यनमस्काराचे प्रात्यक्षिके करताना मुख्याध्यापक व शिक्षक |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव (७५ वर्षे पूर्ती) ७५ कोटी सूर्यनमस्कार घालून साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. देशातील सर्व शाळा, विद्यालये, महाविद्यालये यातील विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. चंदगड तालुक्यात धनंजय विद्यालय नागणवाडी व महात्मा फुले विद्यालय कार्वे या दोन ठिकाणी आज दि. ४ जानेवारी रोजी हे प्रशिक्षण पार पडले.
१ जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२२ या कालावधीत कोणतेही सलग २१ दिवस रोज १३ सूर्यनमस्कार घालून प्रत्येकाने आपली संकल्पपूर्ती करायची आहे. पतंजली योगपीठ, गीता परिवार, क्रीडा भारती, योग फेडरेशन, हार्टफुलनेस यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे. या संस्था याच्या पूर्ततेसाठी परिश्रम घेत आहेत. त्याला आयुष मंत्रालय भारत सरकार व फिट इंडिया मुव्हमेंट यांचे सहकार्य लाभले आहे.
कार्वे येथे झालेल्या प्रशिक्षण वर्गात गीता परिवार संस्थेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा व राष्ट्रीय प्रशिक्षक प्रमिला माहेश्वरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या भारत मातेला सुदृढ व सुसंस्कारित पिढी निर्माण करून द्यायची आहे. देशातील एकही नागरिक आजारी पडणार नाही याची दक्षता घ्यावयाची असेल तर योगाचा नशा चढा पाहिजे. यासाठी दिवसातून काही वेळ द्यावा लागेल. मात्र वेळ मिळत नाही ही पळवाट आपल्याला शारीरिक व्याधींकडे घेऊन जाणारी आहे. सध्या आपल्या देशासह जगातील १६० देशात योगाचे वर्ग सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार संकल्पपूर्तीची शपथ देवऊन मुलांच्या निरोगी व सुदृढ शरीराचा पाया घालून द्यावा असे आवाहन केले.
उपक्रमाचे चंदगड तालुका समन्वयक व हलकर्णी केंद्रप्रमुख वाय के चौधरी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्वे येथील प्रशिक्षण वर्गात चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील नऊ केंद्रातील सुमारे दीडशे प्राथमिक-माध्यमिक शाळा मुख्याध्यापक, शिक्षकांनी सहभाग घेतला. प्रमिला माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर येथील विशाल गोसावी, तनिष्का गोसावी, युवराज इरकल या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके दाखविली. उपस्थित सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे प्रात्यक्षिकात सहभाग घेतला. प्रशिक्षण वर्गांच्या पूर्ततेसाठी गटशिक्षणाधिकारी सौ. सुमन सुभेदार व शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment