'पारगड, हेरिटेज रन' मॅराथॉन स्पर्धा पुढे ढकलली! कधी होणार स्पर्धा.......वाचा....... - चंदगड लाईव्ह न्युज

20 January 2022

'पारगड, हेरिटेज रन' मॅराथॉन स्पर्धा पुढे ढकलली! कधी होणार स्पर्धा.......वाचा.......

पारगड


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

      निसर्ग पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर निसर्ग संवर्धन, लोक प्रबोधनासाठी पारगड हेरिटेज रन (अर्ध मॅरेथॉन स्पर्धा) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. किल्ले पारगड जनकल्याण संस्था, पारगड, मिरवेल, नामखोल ग्रुप ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने २९ व ३० जानेवारी २०२२ रोजी होणारी स्पर्धा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व नवीन नियमावलीमुळे पुढे ढकलण्याचा निर्णय संयोजन समितीने घेतला आहे.

        छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यावरून स्पर्धेत सहभागी होण्याचा रोमांच अनुभवायला सज्ज असलेल्या देशभरातील धावपटूंना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

      स्पर्धा जॉय ऑफ जंगल (५ किमी) जंगल ड्रीम रन (१० किमी) व जंगल हाफ मॅराथॉन (२१ किमी) धावणे अशा तीन श्रेणीमधील पारगड हेरिटेज रन स्पर्धेत 'निसर्गाचे रक्षक' मोहिमेअंतर्गत नैसर्गिक संवर्धन, वृक्ष लागवड, पाणी संवर्धन, कचऱ्याचे पुनर्विनीकरण, नैसर्गिक ऊर्जा कार्यक्षमता या पाच उद्दिष्टांवर प्रबोधनपर होणार होते. स्पर्धेसाठी संबंधित शासकीय विभागांचे सहकार्य लाभले असले तरी कोरोनामुळे सर्वांचा अपेक्षाभंग झाला आहे.

          स्पर्धेच्या नवीन तारखेची घोषणा होताच सर्वांना कळविण्यात येईल अशी माहिती स्पर्धा कमिटीच्या वतीने मुख्य प्रवर्तक प्रवीण चिरमुरे (पारगड) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. याबाबत काही प्रश्न किंवा समस्या असल्यास, कृपया [Whatsapp: 9987322227 | 9892581942] नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment