जिल्हा परिषद शाळेचे महत्त्व हुंदळेवाडी ग्रामस्थांना समजले! - सभापती ॲड. अनंत कांबळे - चंदगड लाईव्ह न्युज

03 January 2022

जिल्हा परिषद शाळेचे महत्त्व हुंदळेवाडी ग्रामस्थांना समजले! - सभापती ॲड. अनंत कांबळे

विद्यार्थ्यांचे स्वागत करून हुंदळेवाडी शाळा  नव्याने सुरू करताना मान्यवर.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

            शिक्षण हक्क कायद्याचा लाभ घ्यायचा असेल तर आपली मुले जिल्हा परिषद शाळेतच घाला. ज्ञान मंदिर कसे सुसज्ज होईल यासाठी प्रयत्नशील राहा. गावातील शाळा बंद पडली की तीचे महत्व समजते. तो अनुभव हुंदळेवाडी ग्रामस्थांनी घेतला आहे, असे प्रतिपादन चंदगड पंचायत समिती सभापती ॲड. अनंत कांबळे यांनी केले. हुंदळेवाडी (ता. चंदगड) प्राथमिक शाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सुप्रिया कांबळे होत्या. जि प सदस्य कल्लाप्पा भोगण यांच्या हस्ते शाळेचे उद्घाटन करण्यात आले.

      पटसंख्येअभावी जिल्हा परिषद प्रशासनाने ही शाळा गेल्या सात-आठ वर्षांपासून बंद केल्यानंतर तिचे महत्त्व ग्रामस्थांना हळूहळू उमगु लागले. पुनश्च शाळा सुरू करण्याच्या मागणीला दोन वर्षानंतर यश आले याकामी जि. प. सदस्य कल्लाप्पा भोगण, विद्या पाटील, सभापती कांबळे, गटशिक्षणाधिकारी सौ. सुमन सुभेदार, शिक्षण विस्ताराधिकारी एम. टी. कांबळे आदींच्या दोन वर्षातील प्रयत्नांना यश आले. यावेळी बोलताना जि. प. सदस्य भोगण म्हणाले ज्या शाळेने सुरज व सिद्धार्थ देसाई सारखे स्टार कबड्डीपटू देशाला दिले ती शाळा  पुन्हा बंद पडणार नाही. यासाठी ग्रामस्थांनी खाजगी शाळांच्या मागे न धावता जागरूक राहून गावातील शंभर टक्के मुले याच शाळेत पाठवावी असे आवाहन केले. यावेळी विलास पाटील, एम. टी. कांबळे, गुंडोपंत देसाई आदींची भाषणे झाली. कार्यक्रमास पं. स. सदस्या नंदिनी पाटील, केंद्रप्रमुख बाळू प्रधान, सुधीर मुतकेकर, कोवाड केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत वै. पाटील, पुंडलिक जाधव, पांडुरंग जाधव, शाळेचे अध्यापक अर्जुन मुतकेकर, ग्रुप ग्रामपंचायत कागणीचे सर्व सदस्य व ग्रामस्थांची उपस्थिती होती. ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक व्ही. एन. देसाई यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष बेळगावकर यांनी केले. अविनाश देसाई यांनी आभार मानले. कार्यक्रमापूर्वी सकाळी गावातून विद्यार्थी व शिक्षक यांची बैलगाडीतून वाजत गाजत शाळेपर्यंत मिरवणूक काढण्यात आली.

1 comment:

Unknown said...

खूपच आनंदायी बातमी. ⭐⭐⭐⭐⭐

Post a Comment