विद्यार्थ्यांनी देशसेवेला प्रथम प्राधान्य द्यावे- लेफ्टनंट रामचंद्र देसाई - चंदगड लाईव्ह न्युज

28 January 2022

विद्यार्थ्यांनी देशसेवेला प्रथम प्राधान्य द्यावे- लेफ्टनंट रामचंद्र देसाई

प्रजासत्ताक दिनी कागणी येथील कार्यक्रमात निवृत्त लेफ्टनंट रामचंद्र देसाई यांचा सपत्नीक सत्कार करताना मान्यवर.

कालकुंद्री :  सी. एल. वृत्तसेवा

       जिद्द, चिकाटी आणि कष्टाची तयारी असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून देशसेवा करता येते. विद्यार्थी, विद्यार्थिनींनी भारतीय सैन्य दलात दाखल होऊन देशसेवेला प्राधान्य द्यावे. असे प्रतिपादन निवृत्त ऑनररी लेफ्टनंट रामचंद्र शिवाजी देसाई (कागणी ता. चंदगड) यांनी केले. ते व्ही के चव्हाण-पाटील विद्यालय कागणी (ता. चंदगड) येथे प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य ए. जे. देसाई होते. 

   प्रास्ताविक जी. आर. कांबळे यांनी केले. बालपणीच आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या रामचंद्र देसाई यांनी अथक परिश्रमाच्या जोरावर सैन्यात भरती होऊन २८ वर्ष देशसीमांच्या रक्षणार्थ सेवा बजावली. या काळातील लेह, लद्दाख, कारगिल मधील रक्त गोठविणारी थंडी व अनेक संकटांवर मात करत केलेल्या देशसेवेचे रोमांचकारी अनुभव कथन केले. यावेळी रामचंद्र देसाई व त्यांच्या पत्नी सौ अविता देसाई यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जीवन शिक्षण संस्थेचे सचिव महालिंगेश्वर हगिदळे, श्रीमती सरोजिनी हगिदळे, सौ. लतिका हगिदळे, संचालक हणमंत पाटील, माजी उपसरपंच रामलिंग पुजारी, सुरेशराव देसाई, अण्णासाहेब देसाई, कमल देसाई, उज्वला देसाई, चंद्रकांत खानापुरे आदींसह ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. डी. एम. जाधव यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment