शिक्षकच अंधश्रद्धा व व्यसनमुक्त समाज घडवू शकतात - शहाजी देसाई - चंदगड लाईव्ह न्युज

23 January 2022

शिक्षकच अंधश्रद्धा व व्यसनमुक्त समाज घडवू शकतात - शहाजी देसाई

कडगाव (ता. भुदरगड) येथे बी एड कॉलेज आंतरवासिता सांगता समारंभात बोलताना शहाजी देसाई सोबत मान्यवर.


 गारगोटी : सी. एल. वृत्तसेवा

  २१ व्या शतकातील डिजिटल व विज्ञान युगातही समाज कर्मकांड आणि अंधश्रद्धेच्या विळख्यात नखशिखांत गुरफटला आहे. तरुण पिढी विविध व्यसनांच्या आहारी जाऊन बरबाद होत आहे. ही चिंतेची बाब आहे. अंधश्रद्धा व व्यसनाधीनतेच्या या गर्तेतून समाजाला केवळ शिक्षकच बाहेर काढू शकतात! असे मत शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष शहाजी देसाई यांनी व्यक्त केले.
  ते कडगाव (ता. भुदरगड) येथे भुदरगड शिक्षण संस्था गारगोटी संचलित कडगाव हायस्कूल व श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालय कडगाव तसेच आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय गारगोटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नुकत्याच झालेल्या शालेय छात्राध्यापक आंतरवासिता सांगता समारंभ व बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी प्राचार्य  एल. जी. हवालदार हे होते. 
           छात्रमुख्याध्यापक आर. ए. मोरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पुढे बोलताना देसाई म्हणाले समाज व विद्यार्थ्र्यांचा शिक्षकांवरील विश्वास आजही ढळलेला नाही. त्यामुळे शिक्षकांनीही अशा गोष्टींपासून स्वतः दूर राहून समाजालाही त्यापासून परावृत्त करावे. असे आवाहन केले. यावेळी संपर्क शिक्षक एम. व्ही. लाड, गटमार्गदर्शक प्राध्यापिका एस. आर. बाड  यांनी मार्गदर्शन केले. शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन  प्राजक्ता देसाई यांनी केले. या कामी छात्राध्यापक जॉर्ज डिमेलो, आकाश भोसले  आदींनी विशेष परिश्रम घेतले. अजित हडळ यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment