ऊस पाचट कुजवणे ही काळाची गरज - तालुका कृषी अधिकारी सुनील जगताप यांंचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

10 January 2022

ऊस पाचट कुजवणे ही काळाची गरज - तालुका कृषी अधिकारी सुनील जगताप यांंचे आवाहन

ऊस उत्पादन वाढ व खोडवा व्यवस्थापन कार्यक्रमात बोलताना मान्यवर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         पर्यावरण संवर्धन हे व्रत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहजपणे हस्तांतरित झाले पाहिजे.उत्पादन वाढवत असताना हे उत्पादन शाश्वत असावे,निसर्गाचा समतोल राखणारे असावे हे विसरून चालणार नाही. याच अनुषंगाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, कोल्हापूर ,तालुका कृषी अधिकारी कार्यालय, चंदगड व सोन पांढर सुंडी शेतकरी उत्पादक कंपनी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे सूंडी (ता. चंदगड) ' ऊस उत्पादन वाढ व खोडवा व्यवस्थापन ' हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमावेळी शेतकऱ्यांना पाचट न जाळता कुट्टी करून कुजविण्याचे  आवाहन करताना तालुका कृषी अधिकारी सुनील जगताप यांनी सांगितले की उसाचे पाचट न जाळता एका आडसरीमध्ये ठेवून कुजवल्याने खूप मोठे फायदे होतात.त्यामुळे हेक्टरी एक ते दीड लिटर पाण्याची व सुमारे 100-150 युनिट विजेची बचत होत असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. पाचटाच्या आच्छादनामुळे भांगलणी व मजुरीच्या खर्चात जवळपास 50% टक्के बचत होते. तसेच पाचट कुजून जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते. मातीतील जैविक घटक वाढल्याने जमिनीतील मूलद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात त्यामुळे अतिरिक्त खतांची मात्रा कमी द्यावी लागते.

       या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले प्रकाश गुरव यांनी उसाचे उत्पादन वाढविण्याविषयी लागवडीपासून तोडणीपर्यंत घ्यावयाची काळजी व खोडवा व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमावेळी कृषी अधिकारी, कोवाड अक्षय गार्डे, कृषी अधिकारी यशोदिप पोळ, बीटीएम् अभिजित दावणे, कृषी पर्यवेक्षक सतीश कुंभार, कृषी सहाय्यक . किरण पाटील, सोन पांढर शेतकरी गटाचे अध्यक्ष, सचिव व इतर शेतकरी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment