अश्व रिंगण सोहळ्याने हाजगोळी तुडये येथील ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता - चंदगड लाईव्ह न्युज

26 January 2022

अश्व रिंगण सोहळ्याने हाजगोळी तुडये येथील ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता

हाजगोळी (ता. चंदगड) येथील ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात  माऊलीचे अश्व धावतानाचा एक क्षण 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           माऊली माऊली...च्या जयघोषात हाजगोळी- तुडये येथील सामुदायिक श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. गेले पाच दिवस भक्तिरसात बुडालेल्या या सोहळ्याची आज सांगता काला कीर्तन व माऊलीचा अश्व रिंगण सोहळ्याने झाली. यंदा अश्व रिंगण सोहळा हे या संपूर्ण ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे प्रमुख आकर्षण होते. यावेळी पंचक्रोशीतून आलेल्या भाविक भक्त, वारकरी मंडळींनी माऊलीच्या अश्वाचे उभे व गोल रिंगण सोहळ्याचा याची देही याची डोळा अनुभव घेतला.
         गेल्या २८ वर्षांपासून हाजगोळी व तुडये गावातील श्री संत ज्ञानेश्वर सांप्रदायिक वारकरी पारायण मंडळ या भक्तिमय मंगलमय सोहळ्याचे आयोजन करत आहे. चंदगड तालुक्यातील या दुर्गम भागात विठ्ठल भक्त व वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात असून तरुण पिढीला चांगल्या सवयी लगाव्यात, वाईट सवयीपासून त्यांना दूर ठेवण्याच्या उद्देशाने या सांप्रदायिक सोहळ्याचे आयोजन केल्याचे या पारायण सोहळ्याचे सल्लागार ह.भ.प. गणपती कनगुटकर यांनी सांगितले. हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पारायण मंडळाचे अध्यक्ष ह. भ. प. वसंत पांडुरंग पाटील, उपाध्यक्ष ह.भ.प. सेक्रेटरी दत्तू पाटील व खजिनदार एम. बी. पाटील यांनी सक्रिय सहभाग व मेहनत घेतली. ह. भ. प. विठ्ठल काळू शिंदे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. 
       गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या सांप्रदायिक भक्तिमय सोहळ्यामध्ये दररोज सकाळी चार वाजल्यापासून काकड आरती, ज्ञानेश्वरी वाचन, भजन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन व असा भरगच्च कार्यक्रम पार पडला.

No comments:

Post a Comment