...आणि लक्ष्मीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले! उपचारांची फाईल 'सी एल' मुळे सापडली - चंदगड लाईव्ह न्युज

24 February 2022

...आणि लक्ष्मीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले! उपचारांची फाईल 'सी एल' मुळे सापडलीचंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       सुळये (ता. चंदगड) येथील श्रीमती लक्ष्मी लक्ष्मण कांबळे यांची वैद्यकीय उपचारांची हरवलेली फाईल चंदगड लाईव्ह न्युजच्या (सी. एल. न्यूज) बातमीमुळे  सापडली. यामुळे लक्ष्मी यांच्या चेहऱ्यावर आनंद व कृतज्ञतेचे हसू फुलले. याकामी चंदगड येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस. आर. देशमुख यांनी सी. एल. न्यूजचे पत्रकार व पत्रकार संघाचे सरचिटणीस चेतन शेरेगार यांच्याशी संपर्क साधून बातमीची विनंती केली होती. फाईल सापडताच लक्ष्मी कांबळे व देशमुख यांनी चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी. एल. न्यूज चॅनेलचे आभार मानले.

        पायाचे हाड फॅक्चर झाल्याने लक्ष्मी या डॉक्टर हत्तरगी हॉस्पिटल गडहिंग्लज येथे  उपचार घेत होत्या. दि. ७ फेब्रुवारी रोजी उपचारांचे रिपोर्ट, रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड आदी महत्त्वाच्या कागदपत्रांसह फाईल हरवली होती. सर्वत्र शोध घेऊन फाईल न सापडल्याने याबाबत १५ फेब्रुवारी रोजी बातमी प्रसिद्ध केली होती. मुळातच आर्थिक अडचणीत असलेल्या लक्ष्मी यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. पण सीएल न्यूज मधील बातमी वाचून शिवाजी आडाव (कडगाव, ता. गडहिंग्लज) यांनी सापडलेली फाईल नंदकुमार कांबळे यांच्यामार्फत एस. आर. देशमुख यांच्यापर्यंत पाठवून दिली. 

           न्यूज चॅनेलच्या माध्यमातून एका गरिबाला मदत झाल्याचे समाधान पत्रकार संघाला मिळाले, असे पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत पाटील व सी एलचे संपत पाटील यांनी व्यक्त केली.No comments:

Post a Comment