पंढरपूर येथे अपघात झालेल्या सुरुतेच्या वारकऱ्याचा मृत्यू, तालुक्यातील वारकरी संप्रदाय हळहळला.. - चंदगड लाईव्ह न्युज

15 February 2022

पंढरपूर येथे अपघात झालेल्या सुरुतेच्या वारकऱ्याचा मृत्यू, तालुक्यातील वारकरी संप्रदाय हळहळला..

मनोहर मल्लू पाटील

एस. एल. तारिहाळकर - कागणी : सी. एल. वृत्तसेवा

          सुरुते (ता. चंदगड) येथील वारकरी मनोहर मल्लू पाटील (वय ४०) हे पंढरपूर येथे अपघातात जखमी झाले होते. सोमवार दि. १४ रोजी सायंकाळी त्यांचा बेळगाव येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेने चंदगड तालुक्यातील संप्रदाय हळहळून गेला.

       सूरुते येथून गावातील वारकऱ्यांच्या वाहनातून  मनोहर पाटील हे बुधवार दि. ९ रोजी पंढरपूर येथे गेले होते. दुसऱ्या दिवशी गुरुवार दि. १० रोजी  दुपारी अडीज वाजता बाजार करण्यासाठी पंढरपूर शहरात पायी चालत जात असताना पाठीमागून येणाऱ्या एका रिक्षाच्या उघड्या दरवाजाची जोरात धडक बसली. यात ते जागीच कोसळले. त्यानंतर तातडीने त्यांना स्थानिक दवाखान्यात दाखल केले. यानंतर बेळगाव येथे सिव्हीलमध्ये उपचारासाठी आणले. इथून पुन्हा बेळगाव येथेच खासगी दवाखण्यात उपचार सुरू ठेवण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा सोमवारी दि. १४ रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी त्यांच्यावर शेकडो वारकऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

         त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन लहान मुली, भाऊ असा परिवार आहे. आशासेविका रेणुका पाटील यांचे ते पती होय. मनोहर हे गावी शेतीच करायचे. या विचित्र अपघाताने चंदगड तालुक्यातील वारकरी संप्रदाय हळहळून गेला. 

          मंगळवार दि. १५ रोजी त्यांच्यावर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी सुरुतेचे सरपंच मारुती पाटील, तंटामुक्त कमिटी  अध्यक्ष बाळू चौगुले, मुकुंद किल्लेकर, गोकुळचे माजी संचालक दीपक पाटील, परशुराम पाटील (यळेबैल)  उपस्थित होते. 

         कोरोना काळात रेणुका व मनोहर या दाम्पत्याने औषध पुरवठ्यापासून अन्य कामातही गावकऱ्यांना मोठी मदत केली होती. विचित्र अपघातामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने सुरुते येथील वारकरी संप्रदायासह तालुक्यातील संप्रदाय हळहळून गेला आहे.

              

No comments:

Post a Comment