किल्ले पारगड येथे म्हाही उत्सव २०२२ संपन्न, कसा साजरा होतो म्हाही उत्सव, काय आहे वेगळेपण..... वाचा सविस्तर......... - चंदगड लाईव्ह न्युज

21 February 2022

किल्ले पारगड येथे म्हाही उत्सव २०२२ संपन्न, कसा साजरा होतो म्हाही उत्सव, काय आहे वेगळेपण..... वाचा सविस्तर.........

पारगड येथील भवानी देवी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         ऐतिहासिक किल्ले पारगड (ता. चंदगड) येथे माघ पौर्णिमे निमित्त साजरा होणारा म्हाही उत्सव  उत्साहात व जल्लोषात साजरा झाला. या उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मंगळवार दि. १५फेब्रूवारी रोजी कान्होबा शंकर माळवे यांच्यातर्फे श्री भवानी देवीच्या गाभाऱ्यातील चांदीचे मखर अर्पण करण्यात आले. श्री भवानी देवीचा लघुरुद्राभिषेक यजमान श्री विश्वास आडाव व पुरोहीत संजय मणेरीकर यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

पारगड येथे म्हाही उत्सवानिमित्त जमा झालेले ग्रामस्थ.

         कै. वसंत गोपाळ नांगरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ उभारलेल्या स्वराज्य माता जिजाऊ व बाल शिवराय या शिल्पाचे अनावरण श्रीमती उषा वसंत नांगरे यांच्या हस्ते झाले.

           गडाचा महादरवाजा व  शिवरायांची सदर येथील नुतन स्थापित तोफांचे अनावरण  बिपिन चिरमुरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी आपले मनोगत  व्यक्त करताना बिपिन चिरमुरे यांनी मंदिर परिसरातील देखभाल खर्चा करीता प्रती वर्षी रु.५०,०००/- देणगी देण्याचे जाहीर केले. प्रथेप्रमाणे उत्तर रात्रौ महाप्रसाद व श्री भवानी देवीचा गोंधळ संपन्न झाला.

कै. वसंत गोपाळ नांगरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ उभारलेल्या स्वराज्य माता जिजाऊ व बाल शिवरायांचे शिल्प. 

          बुधवार दि १६ फेब्रुवारी रोजी श्री. विठ्ठल राघोबा शिंदे यांच्या तर्फे सदरेवर नुतन श्री वनदेवता तुळशी वृंदावनाचे उद्यापन करण्यात आले. रात्रीचा महाप्रसाद सुरेश कृष्णा चिरमुरे व प्रेमनाथ कदम यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला. उत्सवाच्या अनुषंगाने दानशूर तसेच इतर मान्यवर व्यक्तींचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता नाटयतरंग गोवा प्रस्तुत आकाशमिठी या ऐतिहासिक नाट्याचे आयोजन करण्यात आले होते.

         या उत्सवासाठी किल्ले पारगड ग्रामस्थ, मुंबईकर व आजुबाजूच्या परिसरातील श्री भवानी देवी प्रती श्रद्धा असलेले भाविक देवीची ओटी भरणे व गोंधळातील दिवट्यांनां तेल घालणे करीता आवर्जुन उपस्थित रहातात. सदर कार्यक्रम सध्य परिस्थितीत कोरोनाचे नियम पाळून सर्व भाविकांनी हा उत्सव शिस्तीत व उत्साहात पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment