स्विफ्ट कारमधील २ लाख ७० हजारांची गोवा बनावटीची दारु जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची चंदगड तालुक्यात कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

20 February 2022

स्विफ्ट कारमधील २ लाख ७० हजारांची गोवा बनावटीची दारु जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची चंदगड तालुक्यात कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाने हेरेत कारवाई करत गोवा बनावटीची दारु जप्त केली. 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         हेरे (ता. चंदगड) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या  भरारी पथकाने स्विफ्ट कार वर छापा टाकून गोवा बनावटीचा २ लाख ७० हजार रूपयाच्या मद्यसाठ्यासह ६ लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. मात्र घटनास्थळी मद्यसाठा भरलेली स्विफ्ट कार सोडून संशयित आरोपी दिवाकर लाडु गवस (रा. साटेली भेडशी, घर नं ५११, जळकाटवाडी, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदूर्ग) हा अंधाराचा फायदा घेऊन शिवारातून पळून जाण्यात यशस्वी झाला. ही कारवाई शनिवारी (१९ रोजी) रात्री करण्यात आली.

        कोल्हापूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या  भरारी पथकाला हेरे - मोटणवाडी रस्त्यावरून  बेकायदा गोवा बनावट मद्याची अवैद्यरित्या चोरटी वाहतुक होणार असल्याची खबर मिळाली.त्या अनुषंगाने या रस्त्यावर  पथकातील अधिकारी व कर्मचारी गस्त घालत असता, हेरे हददीत पाणंद रस्त्यावर एक संशयास्पद चारचाकी स्विफटकार थांबलेली दिसून आली. म्हणुन सदर कारकडे सरकारी वाहनाने जात असता सदर कार चालकास सरकारी वाहनाची चाहुल लागताच एक व्यक्ती वाहन जागीच सोडुन तेथुन पळुन जात असताना सरकारी वाहनाच्या लाईटच्या उजेडात सदर व्यक्ती हा या  यापुर्वीच्या गुन्ह्यातील दिवाकर गवस असल्याचे दिसले. त्यास नावाने हाक मारता त्याने मागे वळून पाहिले व शेतवडीत अंधाराचा फायदा घेवुन पसार झाला. त्याच्या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीचे  मद्यानेभरलेले एकुण ५० बॉक्स असल्याचे आढळुन आले. प्राथमिक चौकशीमध्ये सर्व मुद्देमाल हा इसम दिवाकर लाडु गवस  याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर छाप्यात वाहनामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे ५० बॉक्स मिळुन आले असुन त्याची बाजारभावानुसार एकुण रु. २ लाख ७० हजार इतकी किंमत आहे. वाहनाची ४ लाख असा एकुण जप्त मुद्देमालाची किंमत रु. ६ लाख ७० हजार इतकी आहे. 

          कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, कोल्हापूरचे निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक विजय नाईक, गिरीषकुमार कर्चे, जवान सर्वश्री सचिन काळेल, राजेंद्र कोळी, सागर शिंदे, मारुती पोवार, जय शिनगारे यांनी सहभाग घेतला. सदर गुन्हयाचा पुढील तपास चालु आहे असे निरीक्षक संभाजी बरगे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment