वीज कंपनीच्या कोवाड कार्यालयाचा गलथान कारभार, ग्राहकांना मनस्ताप - चंदगड लाईव्ह न्युज

27 February 2022

वीज कंपनीच्या कोवाड कार्यालयाचा गलथान कारभार, ग्राहकांना मनस्ताप

कागणी फिडर मधील तारांना चिकटणाऱ्या अशा झाडांच्या फांद्या विद्युत मोटर पंप साठी कर्दनकाळ ठरत आहेत.


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          वीज वितरण कंपनीच्या कोवाड येथील दोन्ही कार्यालयांबाबत ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. येथील गलथान कारभाराचा मनस्ताप ग्राहकांना सोसावा लागत आहे. शेती, घरगुती आदी वीज जोडण्या तसेच इतर कामासाठी ग्राहक रोज हेलपाटे मारत असताना कार्यालयात अधिकारी भेटणे दुरापास्त झाले आहे. कार्यालयात गेलेल्या ग्राहकांना येथील ऑपरेटर कडून रोज "उद्या या" किंवा उडवाउडवीची दुरुत्तरे ऐकण्या पलीकडे काहीच मिळत नाही. ग्राहकाभिमुख सेवा देऊन कारभार न सुधारल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा परिसरातील विविध संघटना व मंडळांनी दिला आहे.

          कंपनीच्या कोवाड कार्यालयातील तक्रारींचा आलेख गेल्या काही वर्षात चढता असल्याचे दिसून येते. वैयक्तिक तक्रारींसह  ग्रामपंचायतींच्या कामांना अधिकारी व कर्मचारी सहकार्य करत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ग्रामपंचायत कामांना केराची टोपली दाखवली जाते. कोणतीच कामे वेळेवर केली जात नाहीत. ग्रा. म. पं.  व ग्राहकांच्या मागणीला प्राधान्य देत न देता नेमलेल्या वायरमनच्या सवड व सोयीनुसार कामे केली जातात. परिसरातील शेतकरी संघटनेच्या वतीने कागणी फिडर वरील शिवारातील विज तारांना लागणारी झाडे तोडण्याच्या मागणीसाठी दोन वर्षात दोन वेळा आंदोलने झाली. तरी अधिकाऱ्यांचे या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे वीज ट्रीप होऊन मोटारी जळण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. याचा हजारो रुपयांचा आर्थिक भुर्दंड शेतकरी बांधवांना बसत असला तरी अधिकाऱ्यांना याचे सोयरसुतक दिसत नाही. येत्या पंधरा दिवसात 'ट्री कटिंग' न केल्यास शेतकरी संघटनांच्या वतीने संजय कुट्रे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

        काल कागल येथील कार्यालयाबाबत घडलेल्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर ग्राहकानच्या संतापाचा उद्रेक होण्यापूर्वी वीज वितरण कंपनीने आपली सेवा तत्पर व ग्राहकाभिमुख करण्याची गरज निर्माण झाली आहे. वीज सेवा खंडित करण्यात तत्परता दाखवणारे कर्मचारी व अधिकारी चिरीमिरीची अपेक्षा न ठेवता तत्पर सेवा देतील का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

No comments:

Post a Comment