मतदारांना लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी! राष्ट्रीय मतदार जागृती अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन, काय आहे संकल्पना.......... - चंदगड लाईव्ह न्युज

27 February 2022

मतदारांना लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी! राष्ट्रीय मतदार जागृती अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन, काय आहे संकल्पना..........


कालकुंद्री : विशाल पाटील / सी. एल. वृत्तसेवा

         भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार जागृती अभियान अंतर्गत प्रश्नमंजुषा, गीत गायन, व्हिडिओ तयार करणे, पोस्टर (भित्तिचित्र), व घोषवाक्य तयार करणे. या पाच स्पर्धांचे आयोजन केले असून यात मोठ्या संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन गडहिंग्लजचे उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, चंदगडचे तहसीलदार विनोद रणवरे व नायब तहसीलदार सचिन आखाडे यांनी केले आहे.

        स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या मतदाराने १५ मार्च २०२२ अखेर आपले साहित्य निवडणूक आयोगाकडे पाठवणे बंधनकारक आहे. बाराव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त २५ जानेवारी पासून मतदार जागरूकता स्पर्धा सुरू झाली आहे. मतदारांचे प्रबोधन करणे, त्यांचा निवडणूक कार्यक्रमातील सक्रिय सहभाग वाढवणे, त्यांच्या प्रतिभा आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे हा स्पर्धेचा उद्देश असून सर्व वयोगटांसाठी ही स्पर्धा खुली ठेवण्यात आली आहे. स्पर्धेचा विषय आहे. "माझे मत माझे भविष्य, एका मताचे सामर्थ्य."

    स्पर्धेबाबत अधिक माहिती पुढील प्रमाणे- 

         'प्रश्नमंजुषा' स्पर्धेतील प्रश्नांद्वारे स्पर्धकाची निवडणूक प्रक्रियेबाबत जागृकता तपासली जाईल. निवडणूक विषयक माहिती, मतदार यादी, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, निवडणूक कायदा, भारतीय निवडणुकांचा इतिहास यावर आधारित प्रश्न असतील. यातील विजेत्यांना भारतीय निवडणूक आयोगाचे नाव असलेल्या आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात येईल. 

          'गीत गायन' स्पर्धेत 'माझे मत, माझे भविष्य' या विषयावर स्पर्धक गीत तयार करून आपल्या आवडीचे वाद्य वापरून गायन करू शकतात. त्याचा कालावधी तीन मिनिटांपेक्षा अधिक नसावा. ही स्पर्धा संस्थात्मक, व्यवसायिक आणि हौशी अशा तीन गटात असून संस्थात्मकसाठी अनुक्रमे रु १ लाख, ५० हजार, ३० हजार, १५ हजार, व्यवसायिकसाठी अनुक्रमे ५०, ३०, २० व १० हजार तर हौशी गटासाठी २०, १०, ७ हजार ५००, व ३ हजार अशी बक्षिसे आहेत. 

           'व्हिडिओ मेकिंग' स्पर्धेत कॅमेरा प्रेमींना भारतीय निवडणुकांचा उत्सव, त्यातील विविधता व्हिडिओबद्ध करण्याची संधी मिळते. माहितीपूर्ण, प्रलोभनमुक्त मतदान, मतदानाची शक्ती, महिला, दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, तरुण व नवीन मतदारांसाठी मतदानाचे महत्त्व व्हिडिओतून अधोरेखित झाले पाहिजे. व्हिडिओ केवळ एक मिनिटाचा असावा. या स्पर्धेतील संस्थात्मक गटासाठी अनुक्रमे रु. २ लाख, १ लाख, ७५ व ३० हजार. व्यवसायिक गटासाठी  ५०, ३०, २० व १० हजार तर हौशी  गटासाठी ३०, २०, १० व ५ हजार अशी बक्षिसे आहेत. 

         'पोस्टर / भित्तीचित्र' स्पर्धेत चित्रकार डिजिटल आरेखन किंवा रंगवलेली भित्तिचित्रे पाठवू शकतात ही स्पर्धा देखील तीन श्रेणीत असून यासाठी संस्थात्मक श्रेणीसाठी अनुक्रमे ५०, ३०, २०, १० हजार, व्यवसायिक साठी ३०, २०, १० व ५ हजार तर हौशी गटासाठी २०, १०, ७५०० व ३ हजार अशी बक्षिसे आहेत. 

        'घोषवाक्य स्पर्धा' लेखणी तलवारीपेक्षा बलशाली आहे. याची प्रचिती देणाऱ्या घोषवाक्य स्पर्धेसाठी आपल्या स्लोगन तथा घोषवाक्यातुन स्पर्धक मतदारांना प्रवृत्त करू शकतात. ही स्पर्धा एकाच खुल्या गटात असून यातील विजेत्यांना अनुक्रमे रुपये २०, १० व ७,५०० व उत्तेजनार्थ पन्नास स्पर्धकांना प्रत्येकी २ हजार रुपये पुरस्कार म्हणून देण्यात येणार आहेत. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी चंदगड तहसील कार्यालय येथे निवडणूक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रांताधिकारी वाघमोडे, तहसीलदार रणवरे यांनी केले आहे. स्पर्धेबाबत अधिक माहिती स्पर्धक-  https://ecisverp.nic.in/contest/ येथे पाहू शकतात.

No comments:

Post a Comment