मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठींबा देण्यासाठी आलेले मुंबईस्थित चंदगड तालुका रहिवासी संघटनेचे पदाधिकारी. |
मुंबई / सी. एल. वृत्तसेवा
मराठा आरक्षणासह विविध आश्वासित मागण्याच्या पुर्ततेसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु केले. या उपोषणास राज्यभरातुन उत्स्फूर्तपणे पाठींबा मिळत आहे. या अंदोलनाला मुंबईस्थित चंदगड तालुका रहिवाशी संघटनेनेही आपला पाठींबा जाहीर केला. आझाद मैदानावर संघटनेचे अध्यक्ष भरमू नांगनुरकर, लक्ष्मण गावडे, रोहन बाणेकर, प्रविण पास्टे, डी. एम. पाटील, अमित ढेरे, प्रकाश पाटील आदीनी पाठिंब्याचे पत्र खास. संभाजीराजे यांचेकडे सुपूर्द केले.
पाठींबा पत्रात म्हटले आहे की, ``मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी शिव-शाहूचे वारसदार उपोषणाला बसतात याची जरा तरी राजकर्त्यांना लाज वाटली पाहीजे होती. गेंड्याचं कातडं पांघरलेल्या सरकारला मराठ्यांचे प्रश्न महत्त्वाचे वाटत नाहीत. पण मराठ्यांच्याच जीवावर मोठे झालेल्याना छत्रपतींचा स्वाभिमानी मराठा मावळा त्यांची जागा येत्या निवडणुकीत दाखवल्याशिवाय राहणार नाही. याशिवाय मुंबई डिलाईड रोड येथे छत्रपतीं शाहू महाराजाच्या स्मारकासाठी ही समस्त कोल्हापूरकर आग्रही असून प्रसंगी अंदोलन उभे करावे लागले तरी मागे हटणार नाही. मुंबई आझाद मैदानावर संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी राज्यात विविध शहरे, गावांमध्ये साखळी आंदोलने, उपोषण केली जात आहेत. मराठा आरक्षणासाठी पुकारलेले बेमुदत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. उपोषणकर्ते व कार्यकर्त्यांचा आझाद मैदानातच मुक्काम मांडला आहे. मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, असा निर्धार संभाजीराजे यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment