ऊस लागण अर्ध्यावरच, शेतकरी तलावात बुडाला, अन् चंदगड तालुका हळहळला.... - चंदगड लाईव्ह न्युज

28 February 2022

ऊस लागण अर्ध्यावरच, शेतकरी तलावात बुडाला, अन् चंदगड तालुका हळहळला....

पुंडलिक धाकलू पवार

 *कागणी : एस. एल. तारिहाळकर* / सी. एल. वृत्तसेवा

 मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील धडधाकट तरुण शेतकरी पुंडलिक धाकलू पवार (वय 35) याचा ऊस लागण करण्यासाठी पाणी सोडण्याच्या तयारीत असतानाच पाय घसरून तलावात बुडून मृत्यू झाला. ऊस लावणसाठी सुंडी येथील पै-पाहुणे घरी आलेले असताना अचानकपणे पुंडलिकच ऊस रोपलागण सोडून अर्ध्यावरच निघून गेला. काही दिवसांपूर्वी खुद्दतोड करून कारखान्याला 200 टन ऊस घातलेला हा शेतकरी पोहता न आल्याने तलावात बुडून मृत्यू झाला. या घटनेने मांडेदुर्ग परिसरासह चंदगड तालुका हळहळला. सुंडी या सासरवाडीकरांनाही मोठा धक्का बसला आहे. मांडेदुर्ग जवळ खडीमशीन आहे. या ठिकाणी धामणेकर यांचे मोठ्या खोलीचे तळे आहे. या तळ्यात मत्स्यपालन करण्यात येते. या तळ्यामध्ये दुसरीकडून मोटारीने पाणी आणून सोडले होते. सदर मोटारीला पाईप जोडून ते पाणी आपल्या शेतात ऊस लागणसाठी वळवण्यासाठी पाईप जोडत असताना पुंडलिक याचा तळ्याच्या काठावरुन पाय घसरून तळ्यात पडला. त्याला पोहता न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. सकाळी सात वाजता ही घटना घडली. पुंडलिक अद्याप का परतले नाहीत, म्हणून पहायला गेलेल्या सुंडीच्या पाहुण्यांना सदर घटना 11 वाजता उघडकीस आली. चंदगड येथे पोस्टमार्टम करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सोमवारी त्याच्यावर सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुली आहेत. त्यांची मोठी मुलगी दहावीला तर लहान मुलगी आठवीला गावातीलच जय हनुमान हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. पुंडलिक याचे 12 वी पर्यंत शिक्षण झाले असून मनमिळावू असा स्वभाव असल्याने तो सर्वात मिळूनमिसळून असायचा. गावातील जय गणेश मंडळाचा तो सदस्य होता. तब्येतीने धडधाकट असणाऱ्या पुंडलिकाने काही दिवसांपूर्वीच खुद्दतोड करून 200 टन ऊस कारखान्याला घातला. पुन्हा एकदा नव्या ऊस लागणीसाठी धडपडत असतानाच नीयतीने पुंडलिकचा घात केला, अन् सुरू असलेली ऊस लागण अर्ध्यावरच टाकून गेला. मोठ्या हौसेने ऊस करणारा शेतकरी पुंडलिक हा अचानकपणे निघून गेल्याने सुंडी येथील सासरवाडीकरांनाही मोठा धक्का बसला आहे.


No comments:

Post a Comment