गुजरात राज्यातील मोरबी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

19 February 2022

गुजरात राज्यातील मोरबी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात संपन्न

मोरबी गुजरात येथे शिवजयंतीनिमित्त शिव पुतळ्याचे पूजन प्रसंगी राजूभाई पाटील व महाराष्ट्रीयन बांधव.

राजकोट/मोरबी : सी. एल. वृत्तसेवा

           रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती महाराष्ट्रात अपार उत्साहात साजरी होत असताना गुजरात राज्य ही यात मागे नाही. गुजरात मधील सौराष्ट्र विभागातील मोरबी शहरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अखील सौराष्ट्र महाराष्ट्रीयन मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजूभाई पाटील (मुळगाव कालकुंद्री, ता. चंदगड, जि  कोल्हापूर) यांच्या हस्ते शहरातील मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी उद्योग, व्यवसाय, नोकरीच्या निमित्ताने मोरबी शहरात स्थायिक झालेले महाराष्ट्रीयन बांधव अनय लिगाडे, सुनील लिगाडे, सचिन पाटील, सयाजी पाटील, चंद्रकांत ढेरे, भास्कर सोलनकर, ज्ञानेश्वर सोलनकर, प्रयाग सोलनकर आदींसह मोरबी शहरातील नागरिकांची उपस्थिती होती.

             अखिल सौराष्ट्र महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून राजकोट, सुरेंद्रनगर, जामनेर, जुनागड, सोमनाथ, अमरेली, भावनगर, द्वारका आदी शहरांसह गुजरात मधील सर्वच शहरात शिवजयंती साजरी करण्यात आली.  गुजरात राज्यात मराठी सण, उत्सव, संस्कृतीचे संवर्धन करण्यात अखिल सौराष्ट्र महाराष्ट्रीयन मंडळाचे मोठे योगदान मिळत आहे. गुजरात मध्ये मराठी संस्कृती टिकवण्याचं बरोबरच मराठी माणसाच्या उन्नतीसाठी लढण्याचे बळ आम्हाला राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतूनच मिळत असल्याचे डॉ. राजूभाई पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment