कालकुंद्री येथे जांभेकर जयंती व पत्रकार दिन उत्साहात, चंदगड तालुका पत्रकार संघातील पत्रकारांची उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

23 February 2022

कालकुंद्री येथे जांभेकर जयंती व पत्रकार दिन उत्साहात, चंदगड तालुका पत्रकार संघातील पत्रकारांची उपस्थिती

कालकुंद्री येथे २० फेब्रुवारी पत्रकार दिन प्रसंगी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचे पूजन करताना प्रमुख पाहुण्यांसह पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या २० फेब्रुवारी या जन्मदिनी पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कालकुंद्री येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार ढेरे होते. 

         प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक हवालदार शंकर कोले ( तालुकाध्यक्ष मानव हक्क संघटना चंदगड व तंटामुक्त समिती अध्यक्ष कालकुंद्री), तसेच मुंबई पोलीस दलातील निवृत्त सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग चौगुले (महागाव) संस्थापक पोलीस कुटुंब कल्याण संस्था महाराष्ट्र यांची उपस्थिती होती.

सी. एल. न्यूजचे प्रतिनिधी पत्रकार संघाचे सदस्य विशाल पाटील हे 'एमसीए परीक्षा' फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार करताना मान्यवर.

     स्वागत पत्रकार संघाचे संस्थापक सदस्य उदयकुमार देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रास्ताविक करताना पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म २० फेब्रुवारी १८१२ रोजी झाल्याचे शासकीय संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे यापुढे २० फेब्रुवारी याच दिवशी पत्रकार दिन साजरा करण्याचे मुंबई मराठी पत्रकार परिषदेने (पत्रकारांची मातृसंस्था) यापूर्वीच घोषित केले आहे. तर ६ जानेवारी या दिवशी जांभेकर यांनी दर्पण हे नियतकालिक सुरू केले होते. त्यामुळे दरवर्षी ६ जानेवारी हा 'दर्पण दिन' म्हणून साजरा केला जाणार आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यावे व त्याची अंमलबजावणी करावी असे आवाहन चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने केले. 

          यावेळी प्रमुख उपस्थित असलेले कोवाड केंद्राचे केंद्रप्रमुख सुधीर मुतकेकर (कुदनूर) व नंदकुमार ढेरे आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. शंकर कोले यांनी आपल्या सेवेतील अनुभव सांगताना बेळगाव वेंगुर्ले मार्गावरील हिंडलगा नजीकच्या मिल्ट्री विनायक मंदिराचे सुशोभीकरण आपल्या इन्चार्ज काळात केले. मंदिर परिसरात गार्डन सह ३२ लाखांची विकास कामे याच काळात झाल्याचे सांगितले. सहा. पोलीस निरीक्षक पांडुरंग चौगुले यांनी पोलिस व पत्रकार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ गणले जातात. देशाचे पंतप्रधान व राष्ट्रपती जे करू शकत नाही ते काम पत्रकार करू शकतात. सामाजिक स्वास्थ्य निरोगी ठेवण्यासाठी पत्रकारांची लेखणी फार मोठे कार्य करत असल्याचे गौरवोद्गार काढले. 

         यावेळी पत्रकार संघाचे सरचिटणीस चेतन शेरेगार, सी. एल. माझाचे  संतोष सुतार, एस. एम. ७ चॅनेलचे शहानुर मुल्ला, युवा संवादचे प्रतिनिधी सागर चौगुले, पत्रकार संजय के. पाटील, प्रदीप पाटील, रवी मोहिते, विशाल पाटील, भावकु पाटील, संजय प्र. पाटील, श्रीनाथ गावडे, घनश्याम पुजारी आदींसह चंदगड तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते. चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी. एल. न्यूज चॅनेलचे संपत पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment