हेमरस (ओलम) कडून उच्चांकी ७ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण, १७ मार्च ला १२ व्या गळीत हंगामाची सांगता करणार - बिझनेस हेड भरत कुंडल यांची माहीती - चंदगड लाईव्ह न्युज

11 March 2022

हेमरस (ओलम) कडून उच्चांकी ७ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण, १७ मार्च ला १२ व्या गळीत हंगामाची सांगता करणार - बिझनेस हेड भरत कुंडल यांची माहीती

राजगोळी येथील हेमरस साखर कारखाना.


कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

              राजगोळी खुर्द-चननेहट्टी (ता. चंदगड) येथील ओलम ऍग्रो इंडिया प्रा. लिमिटेड (हेमरस) या साखर कारखान्याने यंदाच्या 12 व्या गळीत हंगामात  आज अखेर एकूण 140 दिवसात उच्चांकी 7 लाख मेट्रिक  टन ऊसाचे  रेकॉर्ड ब्रेक गाळप करून नवीन उद्दिष्ट पूर्ण केले असल्याची माहिती कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी दिली आहे. 

          याचे संपूर्ण श्रेय भागातील ऊस उत्पादक , तोडणी वाहतूक कंत्राटदार, कामगार, अधिकारी वर्ग आणि हेमरसचे हितचिंतक यांना जाते असे कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल सांगितले. 15 फेब्रुवारी पर्यंत गाळप झालेल्या ऊसाची बिले ही संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली. 16 फेब्रुवारी नंतर ची बिले येत्या आठवड्यात देण्यात येणार असून यंदाच्या 2021-22 गळीत हंगामाची सांगता 17 मार्च ला सकाळी 10 वाजता होणार असल्याची माहिती देखील यावेळी कुंडल यांनी दिली. यंदाच्या गळीत हंगामात चंदगड, गडहिंग्लज, आजरा आणि सीमा भागातून 20 हजार 599 शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा केला आहे. सध्या भागातील शिल्लक ऊस उपलब्धता लक्ष्यात घेता 2021-22 च्या गळीत हंगामाची सांगता दि. 17 मार्चला नियोजित केली आहे. ज्या ठिकाणी ऊस शिल्लक राहिला आहे त्या शेतकऱ्यांनी आमच्या संबंधित गट ऑफीसला संपर्क करून 16 मार्चपर्यंत ऊस पाठवण्याची व्यवस्था करावी. जेणेकरुन भागातील संपूर्ण ऊस उचलला जाईल असे आवाहन यावेळी कुंडल यांनी केले.

         कारखान्यामार्फत ऊस उत्पादन वाढीसाठी वेळोवेळी शेतकरी मेळावे घेण्यात आले असून यापुढे देखील अशा प्रकारचे कार्यक्रम शेतकऱ्यासाठी आयोजित करण्याचे आश्वासन दिले. 2 लाख मेट्रिक टन पासून सुरू झालेला कारखाना आज अखेर उच्चांकी 7 लाख मेट्रिक टनावर पोचला असून पुढील दोन वर्षात 10 लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याच्या उद्दिष्ट पूर्तीच्या दिशेने कारखान्याची वाटचाल सुरू असल्याची माहिती यावेळी कुंडल यांनी दिली.

No comments:

Post a Comment