कोणी रस्ता देता का रस्ता? रस्त्याअभावी अडकूरमध्ये १०० टन ऊस शेतात पडून, काय आहे सद्यस्थिती.........वाचा...... - चंदगड लाईव्ह न्युज

18 March 2022

कोणी रस्ता देता का रस्ता? रस्त्याअभावी अडकूरमध्ये १०० टन ऊस शेतात पडून, काय आहे सद्यस्थिती.........वाचा......

अडकूरमध्ये रस्त्याअभावी शेतात तोडणीनंतर वाळत पडलेल्या ऊसावर पाणी शिंपडताना शेतकरी.

अडकूर / एस. के. पाटील

         अडकूर (ता. चंदगड) येथील शेतकऱ्यांचा  जवळपास १०० टन ऊस रत्त्याअभावी  बुधवार दि. १्६  पासून वाळत असलेने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष न दिल्यास या ऊस मध्येच आत्मदहन करण्याचा विचार शेतकऱ्यांनी बोलून दाखवला.

       गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रकरण सुरु असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचा ऊस शेतात वाळला जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

       अडकुर गावामधील विंझणे रोडवर असलेल्या चीरेखनीचे माळावर न्हाव्याची व्हळ नावाच्या शेतात बुधवारपासून तुकाराम गावडे, पांडुरंग गावडे, मारुती गावडे यांचा सुमारे ८०  ते १०० टन ऊस वाळत पडला आहे. गेल्या सहा महिन्यापासून तहसीलदार यांच्याकडे वाटेसाठी रीतसर अर्ज करूनही त्यातून मार्ग निघाला नाही. स्वतः तहसीलदार शेतातील जागेवर  दोन वेळा भेट देवून पाहणी करून गेले. त्यांनी सूचना केल्या पण यातून कोणताच मार्ग निघाला नाही. तहसिलदार येतात शेतकऱ्यांना सूचना करून निघून गेले की पुन्हा आहे तसाच प्रश्न निर्माण होतो. गावातील शेतकऱ्यांच्या राजकारण व प्रशासनाचे दुर्लक्ष चंदगड तालुक्यातील या अडकूरमधील गावडे कुटुंबियांचे ऊसाचे मोठे नुकसान होत आहे. वर्षभर काबाडकष्ट करून तोंडाला आलेले पिक वाळत असलेने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. 

         चंदगड तालुक्यात ऊस क्षेत्र प्रचंड वाढले आहे. गावागावांमधून शेतामध्ये जाण्यासाठी रस्त्यांची मोठी अडचण निर्माण झाली  आहे. वेगवेगळ्या कारणाने हद्दीवरून भांडणे होत असल्यामुळे शेतकरीच  शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत. पाणंद रस्तेही पुरेसे  नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याने कष्टाने शेतात पिकवलेले ऊस पिक बाहेर रस्त्यावर आणायचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. ऊस पिक हे नाशिवंत असल्यामुळे पिकाला वेळेत शेतातून बाहेर काढणे गरजेचे आहे.  त्यामुळे कोणतीही अघटीत घटना घडण्यापूर्वी प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी यातून त्वरित मार्ग काढून शेतकऱ्यांच्या पिकाचे होणारे नुकसान टाळावे अशीही मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment