पुण्याच्या आर्किटेक्चर कॉलेज कडून पाटणे येथे गाव आराखडा सर्वेक्षण - चंदगड लाईव्ह न्युज

26 March 2022

पुण्याच्या आर्किटेक्चर कॉलेज कडून पाटणे येथे गाव आराखडा सर्वेक्षण

प्राचार्य डॉ कोळी, मार्गदर्शक प्राध्यापक व सर्वेक्षण आराखडा टीम मधील प्रशिक्षणार्थी.
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
  पुणे येथील अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर च्या वतीने पाटणे ता. चंदगड गाव वस्ती सर्वेक्षण करून आराखडा तयार केला जाणार आहे. ७ ते १० एप्रिल २०२२ दरम्यान होणाऱ्या सर्वेक्षणाबरोबरच जैवविविधतेने परिपूर्ण असलेल्या व पश्चिम घाटातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील चंदगड परिसराचा अभ्यास दौऱ्याचेही आयोजन करण्यात आले आहे. यात परिसरातील ऐतिहासिक वास्तू पर्यटन स्थळे यांचा अभ्यास करून व्यावसायिक दृष्टिकोनातून आराखडा बनवला जाणार आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र कोळी, प्रा सुनीलकुमार भोसले, प्रा अनुपमा सोनपितळे यांनी दिली आहे.    कार्यक्रमाचे उद्घाटन ७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता रोझरी चर्च पाटणे येथे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, सभापती ॲड अनंत कांबळे, सरपंच गणपतराव दळवी, वनपाल पी एस आवळे आदी मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे.
  पाटणे तील मूलभूत सोयी- सुविधा, जुनी घरे, शाळा, दवाखाना, देवालय, ग्रामपंचायत कार्यालय यांची मोजमापे करणे, गावातील पाण्याची सोय, सांडपाणी व्यवस्थापन आदींचे सर्वेक्षण झाल्यानंतर ९ एप्रिल रोजी सर्व कामांचे ड्रॉइंग प्रदर्शन भरवण्यात येणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोकण विभाग आयुक्त विलास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आर्किटेक्ट मार्गदर्शक यतीन कांदोळकर (गोवा), पर्यावरण तज्ञ धनंजय वैद्य आजरा) यांचे मार्गदर्शन होणार असून यावेळी जिप. सदस्य विद्या पाटील, तहसीलदार विनोद रणवरे, पोलीस निरीक्षक बी ए तळेकर आदी मान्यवर  उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच दळवी, प्राचार्य डॉ. कोळी, संस्थेच्या सरचिटणीस प्रमिलाताई गायकवाड यांनी केले आहे.
दरम्यान अशा प्रकारचा अभ्यास दौरा तालुक्‍यात प्रथमच होत असल्याने याबाबत सर्वत्र औत्सुक्य, कुतूहल व आनंदाचे वातावरण आहे.


No comments:

Post a Comment