नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयाचा समावेश करावा पालकमंत्री पाटील,कामगार मंत्री मुश्रीफ यांचेकडे राज्य गुणवंत कामगार असोसिएशनची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

26 March 2022

नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयाचा समावेश करावा पालकमंत्री पाटील,कामगार मंत्री मुश्रीफ यांचेकडे राज्य गुणवंत कामगार असोसिएशनची मागणी

 

कोल्हापूर येथे नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयाचा समावेश करावा.या मागणीचे निवेदन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना देताना कामगार प्रतिनिधी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयाचा समावेश करावा अशी मागणी राज्य गुणवंत कामगार असोसिएशने पालकमंत्री सतेज पाटील,कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ही शासनाची स्वायत्त संस्था असून या मंडळाच्यावतीने संपूर्ण राज्यभर कामगार व कामगार कुटुंबियांच्या सर्वांगीण उन्नती व प्रगतीकरीता विविध योजना व उपक्रमांचे आयोजन केले जाते. मंडळाच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ तसेच सभासद होणे कामी कोल्हापूर गट कार्यालय महाराष्ट्रामध्ये सातत्याने आघाडीवरती आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यातून व राज्यातून वाढलेली कामगार संख्या, औद्योगिक वसाहती, साखर कारखाने, वीज महामंडळ, बँका, दूध संघ, सूतगिरणी, व्यापारी संकुले, लहान-मोठी हॉटेल्स, लहान-मोठे कारखाने, व या अनुषंगाने वाढलेले संघटित व असंघटित कामगार तसेच कामगार कुटुंबे अशा अनेक कारणामुळे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचा व उपक्रमांचा लाभ घेणाऱ्या कामगार व कामगार कुटुंबियांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. 

पण गट कार्यालय कोल्हापूर तसेच या अंतर्गत येणारी सर्व केंद्रे ही सध्या भाड्याच्या जागेत व अपुऱ्या तसेच जीर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे मंडळाच्या विविध उपक्रमांचा कोल्हापूर जिल्ह्यातील कामगार व कामगार कुटुंबियांना अजिबातच लाभ मिळत नाही. कोल्हापूरचे गट कार्यालय महाराष्ट्रामध्ये सर्वच बाबतीत आघाडीवरती असले तरी, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आजपावेतो एका छोट्याशा भाड्याच्या जागेत आहे. त्याचबरोबर सध्या बांधकाम कामगारांना देखील मंडळाच्या उपक्रमांचा लाभ मिळणार आहे. सध्या राज्य सरकारच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विखुरलेली ४३ शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी आणून, जिल्ह्यातील नागरिकांची सोय करण्याची प्रयत्न सुरू आहे. ही बाब जिल्ह्यातील सर्व जनतेसाठी आनंददायी आहे. अशाच प्रकारे नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये जिल्ह्यातील संघटित व असंघटित कामगारांना इतर सोयी-सुविधा बरोबरच, मंडळाच्या योजनांचा व विविध उपक्रमांचा लाभ मिळण्यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयाचा सदर प्रशासकीय इमारतीमध्ये समावेश करण्यात करावा, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील , कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे लेखी निवेदने देण्यात आले आहे.यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर,महादेव चक्के, शिवाजी चौगुले, भगवान माने, संजय सासणे, सर्जेराव हळदकर, सुरेश पवार, रघुनाथ मुधाळे, प्रवीण भिके, रमेश तळसकर, बाबा ढेरे, विजय आरेकर, बाजीराव हेवाळे ,प्रभाकर कांबळे, केतन कुंभार, तुकाराम चौगुले आदी गुणवंत कामगार व औद्योगिक कामगार प्रातिनिधी उपस्थित होते.





No comments:

Post a Comment