अडकूर घटप्रभा नदीत हत्तीचा जलविहार, रामप्रहरी हत्तीचे दर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

25 March 2022

अडकूर घटप्रभा नदीत हत्तीचा जलविहार, रामप्रहरी हत्तीचे दर्शन

 

हत्तीचे संग्रहित छायाचित्र

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

गडहिंग्लज,आजरा तालुक्यात काल दिवसभर धुमाकूळ घालून हत्तीने आज शुक्रवारी रामप्रहरी  चंदगड तालुक्याच्या हद्दीत प्रवेश केला. अडकूर (ता. चंदगड) येथे नागरिकांना हत्तीचे दर्शन घडले. अडकुर, आमरोळी, गणुचीवाडी, उत्साळी, शिरोली, सत्तेवाडी, इब्राहिमपूर, अलबादेवी परिसरात फेरफटका मारून पुन्हा या हत्तीने नागनवाडी-गडहिंग्लज रस्त्यावर घटप्रभा नदीवरील अडकुर पुलाखाली पाण्यात ठाण मांडली. अडकुर,आमरोळी,पोरेवाडी,गणुचीवाडी, मलगेवाडी,उत्साळी परिसरातील नागरिकांनी हत्तीला पहाण्यासाठी अडकूर पुलावर मोठी गर्दी केली होती.

       सरोळी (ता.गडहिंग्लज)गावची सीमा ओलांडून, घटप्रभा नदी पार करून हत्तीने गणूचीवाडी, आमरोळी इथपर्यंत प्रवास केला. तिथून चंदगड- गडहिंग्लज मार्ग ओलांडून तो उत्साळी, अलबादेवीच्या दिशेने पुढे गेल्याचे नागरिकांनी सांगितले. अडकूर परिसर हा चंदगड तालुक्याला मध्यवर्ती आहे.  या तालुक्यात हत्तींचा वावर वीस वर्षापासुन आहे. मात्र या परीसरात प्रथमच हत्तीचे दर्शन झाले. तो आपल्या मार्गाने सरळ पुढे चालत असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्याच्याकडून नुकसान झाल्याचे वृत्त अद्याप नाही.दरम्यान चंदगड विभागाचे वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल डी.जी.पाटील,ए.डी.वझे,कल्पना पताडे,एस.एस.पवार,के.एस.सानप,खडोपंत कातखडे व आजरा विभागाच्या वन कर्मचारी हत्तीवर लक्ष ठेऊन होते.

हत्तीला जंगलात पिटाळणार

जंगल क्षेत्राला आगी लावण्यात आल्याने जंगली प्राणी मानवी वस्तीत शिरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी जंगलाना आगी लावू नये,असे आवाहन करण्याबरोबरच हत्तीला जंगलात पिटाळून लावण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.नागरिकांनी हत्ती जवळ जाण्याचा धाडस करू नये.असे चंदगड चे वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले यांनी सांगितले.
No comments:

Post a Comment