कोवाड येथे रास्ता रोको आंदोलन प्रसंगी बोलताना दीपक पाटील सोबत कार्यकर्ते व शेतकरी |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
शेती पंपांना रात्री ऐवजी दिवसा किमान दहा तास वीज पुरवठा करावा; या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महावितरणाच्या कोल्हापूर कार्यालयासमोर सुरू केलेल्या आंदोलनास चंदगड तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कोवाड येथे रास्ता रोको करून पाठिंबा व्यक्त करण्यात आला. यावेळी महावितरण कंपनी व शासकीय धोरणाच्या निषेधार्थ 'विज आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची!' 'महावितरणचे करायचे काय? खाली डोके वर पाय!' आदी घोषणा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दीपक पाटील यांनी रात्रीच्या वेळी पिकांना पाणी पाजताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. भारत हा कृषिप्रधान देश असूनही येथे शेतकऱ्यांना आपल्या हक्कांसाठी आंदोलने करावी लागतात. प्रसंगी दरवर्षी राज्यातील शेकडो शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येते. रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जंगली, प्राणी तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे हजारो शेतकऱ्यांचा दरवर्षी मृत्यू होतो. यामुळे त्यांची कुटुंबे देशोधडीला लागतात. विधवा शेतकरी महिलांनी रात्रीच्यावेळी कोणाच्या भरवशावर रात्रीच्यावेळी शेतात जायचे? करण्याचे कोणतेच सोयरसुतक महावितरण व शासनाला नाही. पंजाबच्या शेतकऱ्यांनी जुलमी कृषी कायदे एकजुटीच्या जोरावर केंद्र सरकारला रद्द करायला लावले, याचा धडा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी गिरवून महावितरणची जिरवण्याची वेळ आली आहे. यावेळी एम एन पाटील, संजय कुट्रे, प्रा नंदकुमार गावडे, विक्रम पाटील आदींनी मनोगते व्यक्त केली. या प्रसंगी नरसिंग बाचुळकर, सतीश निर्मळकर, आप्पा वांद्रे, तानाजी आडाव, जानबा गुरव, हनुमंत पाटील, सागर राजगोळकर, शिवाजी भोगण, विक्रम पेडणेकर, विनायक बिर्जे आदींसह तालुक्यातील विविध गावातून शेतकरी उपस्थित होते.
कोवाड येथे नवीन पुला समोरील चौकात केलेल्या रास्ता रोकोमुळे कोवाड ते कामेवाडी, माणगाव, नेसरी, बेळगाव या चारही मार्गावरील वाहतूक दोन तास खोळंबली होती. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस ठाण्याचे अंमलदार राज किल्लेदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले.
No comments:
Post a Comment