कोकणातील मासे विक्रीसाठी थेट 'कुदनुर' बाजारात, खवय्यांसाठी पर्वणी - चंदगड लाईव्ह न्युज

30 March 2022

कोकणातील मासे विक्रीसाठी थेट 'कुदनुर' बाजारात, खवय्यांसाठी पर्वणी

कुदनूर बाजारात मासे विकणारा कोकणातील विक्रेता.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

कुदनूर (ता. चंदगड) येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरतो. गेल्या काही वर्षापासून सुरू असलेल्या या बाजारात विविध भागातून व्यापारी व शेतकरी भाजीपाला, धान्य, कडधान्य, मिरची, मसाले व इतर सर्व जीवनोपयोगी वस्तू विक्रीसाठी घेऊन येत असतात. यात थेट गोवा व कोकणातून विक्रीसाठी येणारे मासे खवय्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. ताजेपणा, दर्जा, सर्वसामान्यांना परवडणारे माफक दर व विविधता यामुळे परिसरातील पंधरा-वीस खेड्यांतील नागरिकांचे पाय खास मासे खरेदीसाठी कुदनूर बाजाराकडे वळताना दिसत आहेत. मासे बाजारात सध्या सुरमई, बांगडा, पापलेट, झिंगा, तारा, अवनी, रावस अशा अनेक प्रकारच्या माशांची आवक आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात थंडावलेला मासळी बाजार सध्या ग्राहकांच्या गर्दीने फुलून जात आहे.


No comments:

Post a Comment