कोवाड येथे ८ एप्रिल रोजी 'बारी' वरील 'सबुद' महानाट्याचा पहिला प्रयोग - चंदगड लाईव्ह न्युज

05 March 2022

कोवाड येथे ८ एप्रिल रोजी 'बारी' वरील 'सबुद' महानाट्याचा पहिला प्रयोग



 कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

 'स्वामी'कार पद्मश्री स्व. रणजित देसाई यांच्या तुफान गाजलेल्या 'बारी' कादंबरीवर आधारित 'सबूद' (शब्द) महानाट्याचा रंगभूमीवरील पहिला प्रयोग रणजित देसाईंची जन्म व कर्मभूमी कोवाड, चंदगड येथे त्यांच्या जयंतीदिनी ८ एप्रिल रोजी सादर करणार असल्याची घोषणा 'नाट्यसंस्कार' मंडळाने केली आहे.

    मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, परिसरात नोकरी, उद्योग, व्यवसाय निमित्य स्थाईक 'चंदगडी' चाकरमानी कलाकारांनी स्थापन केलेल्या 'नाट्यसंस्कार' मंडळाने या नाट्य कलाकृतीची निर्मिती केली आहे. उल्लेखनीय म्हणजे यातील सर्वच कलाकार चंदगड तालुक्यातील आहेत. नाट्यरूपांतर लेखक सना मोरे, निर्माता व गीतकार शिवाजी विष्णू पाटील (नागरदळे), संजय कृ. पाटील, संगीतकार विशाल बोरूले, पार्श्वगायक विजय बोराडे, डॉ नेहा राजपाल, संचिता मोरस्कर तर पार्शसंगीत आहे आनंद कुबल यांचे. नाट्य उभारणीत उद्योजक सत्तूराम मा. मणगुतकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

   'सबूद' महानाट्याला रणजित देसाई यांच्या कन्या पारू नाईक, मधुमती शिंदे, नातू गौरव नाईक व कुटुंबीयांचे सहकार्य व शुभेच्छा असून नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला नाट्यविश्वातील दिग्गज मंडळी उपस्थिती लावणार असल्याची माहिती दोन्ही कुटुंबीय व नाटकाचे दिग्दर्शक जीवन कुंभार यांनी दिली आहे. 

 रणजीत दादांच्या साहित्यावर प्रेम करणारे वाचक व मराठी नाट्य रसिकांना हे महानाट्य रंगभूमीवर पाहण्याची मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. याकामी नाट्यरसिकांसह सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन 'नाट्यसंस्कार' च्या वतीने निर्माता शिवाजी पाटील, दिग्दर्शक जीवन कुंभार, ताम्रपर्णी प्रतिष्ठान कोवाडचे कृष्णा बामणे आदींनी केले आहे.


No comments:

Post a Comment