कोवाड येथे 'शाळा पूर्वतयारी अभियान' अंतर्गत प्रशिक्षण - चंदगड लाईव्ह न्युज

28 March 2022

कोवाड येथे 'शाळा पूर्वतयारी अभियान' अंतर्गत प्रशिक्षण

 

कोवाड येथे 'शाळा पूर्वतयारी अभियान' अंतर्गत प्रशिक्षणासाठी उपस्थित शिक्षक

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा
 कोविड- १९ महामारी चा सर्वच घटकांवर विपरीत परिणाम झाला. तसा शिक्षण क्षेत्रावरही झाला. गेल्या दीड-दोन वर्षात मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले. अंगणवाडी, बालवाडीचा अनुभव लहान मुलांना घेता आला नाही. हे नुकसान भरून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने राज्यात 'शाळा पूर्वतयारी अभियान' सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत केंद्र शाळा कोवाड, ता. चंदगड येथे शिक्षक व अंगणवाडी सेविका यांच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
   केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत वै. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या प्रशिक्षण वर्गात तज्ञ मार्गदर्शक म्हणून युवराज पाटील (अध्यापक विद्या मंदिर कामेवाडी) व अंगणवाडी सेविका मोहिनी मनोहर पाटील (अंगणवाडी सेविका- कोवाड) यांनी दाखल पात्र बालकांची पहिलीत शंभर टक्के नोंद करणे, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उपाय योजना राबवणे, पालकांच्या नोंदी करून त्यांचे गट तयार करणे, मेळावे घेऊन मार्गदर्शन करणे, सुरुवातीस मुलांचे मूल्यमापन करणे आदी मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख सुधीर मुतकेकर यांनी अभियान यशस्वी करण्यासाठी पालक, ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा आणि इयत्ता ६ वी ते १० वी विद्यार्थी स्वयंसेवकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले. यावेळी यावेळी आप्पाराव पाटील, श्रीकांत सुबराव पाटील, बी एस शिरगे, नारायण कोकितकर, प्रकाश नांदुडकर, सुवर्णा आंबेवाडकर, संतान लोबो, कविता पाटील हे मुख्याध्यापक शिक्षक, अंगणवाडी सेविका यांची उपस्थिती होती. चंदगड बी आर सी निरिक्षक व विशेषज्ञ महादेव नाईक यांनी  अभियान बाबत माहिती देणाऱ्या विविध स्टॉलची  पाहणी करून समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणपती लोहार यांनी केले. आभार पा. रा. पाटील यांनी मानले.



No comments:

Post a Comment