चंदगड तालुक्यात अवकाळी पावसाचा दणका,गंधर्वगड येथे घरावर कोसळली वीज, लाखोंचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

26 March 2022

चंदगड तालुक्यात अवकाळी पावसाचा दणका,गंधर्वगड येथे घरावर कोसळली वीज, लाखोंचे नुकसान

 

वादळामुळे पत्रे उडून गेल्याने शाळेचे नुकसान.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

 चंदगड तालूक्यातील माणगाव, डुक्करवाडी, बागिलगे, शिवनगे, पाटणे फाटा, हलकर्णी, दाटे, नरेवाडी, जट्टेवाडी, गुडेवाडी, केरवडे, केंचेवाडी, सातवणे, परिसरात मेघगर्जनेसह आज अवकाळी पावसाने जोरदार दणका दिला.

गंधर्वगड येथे घरावर वीज पडल्याने तुटलेला स्लॅप

        वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने घरावरील पत्रे,सोलार पॅनेल, उडून गेले,तर माणगाव, केंचेवाडी डूक्करवाडी येथे घराची पडझड झाली.माणगाव येथील हायस्कूल व केंचेवाडी येथील मराठी शाळेवरील पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.तर गंधर्वगड येथील अनिल होडगे यांच्या नवीन घरावर वीज कोसळून घराची गॅलरी कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

नागणवाडी ऍड करू मार्गावर वादळामुळे रस्त्यावर पडलेले झाड

माणगाव येथील दिव्यांग युवक अमृत गुंडू होनगेकर यांच्या मानेवर पत्रा पडून ते जखमी झाले.सुदैवाने जीवीत हानी झाली नाही.डाॅ बाळासाहेब बेनके यांच्या घरावरील सोलार पॅनेल, सुभाष ससेमारी,आप्पाजी सुतार, लक्ष्मण तुकाराम बेनके,मारुती बेनके( माणगाव) शिवाजी ढेरे, दत्तु वर्पे(डुक्करवाडी) यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले.


        आज दुपारनंतर दरम्यान ढगाळ वातावरणामुळे उष्मा जाणवत होता. दुपारी दोनच्या दरम्यान सुसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. पाऊस एवढ्या जोराचा होती की पावसाने शिवारात पाणी साठले होते. त्यामुळे ऊसाला पाणी पाजवण्यासाठी शेतकऱ्यांना चार दिवस विश्रांती मिळाली आहे. सुसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतातील मका भुईसपाट झाला आहे. अचानक झालेल्या पावसामुळे बहुतःश गावातील गटारे तुंबल्याने गावात दलदल झाल्याचे चित्र तालुक्यात दिसत होते. हा पाऊस ऊस,उन्हाळी भात काजू व भुईमूगाला लाभदायक ठरला ठरला आहे.



 


No comments:

Post a Comment