काजू उत्पादक शेतकऱ्यांची अडकुर येथे बैठक संपन्न, वाचा काय झाला निर्णय.... - चंदगड लाईव्ह न्युज

21 March 2022

काजू उत्पादक शेतकऱ्यांची अडकुर येथे बैठक संपन्न, वाचा काय झाला निर्णय....

 

काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीवेळी उपस्थित मान्यवर

 तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

 अडकुर ( ता. चंदगड ) येथील रवळनाथ मंदिरात काजू हंगाम सन 2022 च्या नियोजनासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत मागील दोन वर्षांत बळीराजा काजू समितीने केलेल्या कार्याचा आढावा घेऊन सन 2022 च्या चालु हंगामातील काजू आंदोलनाचे नियोजन ठरवण्यात आले. लाॅकडाऊनच्या दोन वर्षांच्या कालखंडात बळीराजा काजू संघर्ष समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत  शेतकऱ्यांनी संयम राहून दिलेल्या प्रतिसादामुळे काजू खरेदीदार व व्यापाऱ्यांनी  52 रुपयांपासुन सुरु केलेल्या खरेदीपासुन 110 ते 130 रुपये दर घेण्यापर्यंत मजल मारता आली.  याविषयीची सविस्तर माहिती आणि आढावा  नितीन पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात घेतला. यावर्षीच्या आंदोलनाची दिशा  नितीन पाटील यांनी बैठकीत अतिशय प्रभावीपणे मांडली. 

             शेतकऱ्यांनी काजू व्यवस्थित कशी साठवावी याविषयी प्रबोधन या बैठकीत करण्यात आले. शेतकऱ्यांनी खराब काजू बाजुला काढावी,  पडलेलीच काजू वेचावी, ती धुवून, वाळवून मगच गोनपाटात म्हणजेच पोत्यात साठवावी. किमान चांगली दोन उन्हे देऊन खात्री करूनच काजू साठवावी. एकंदरीत आपला कच्चा माल चांगला आणि दर्जेदार असावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीत शाहू सहकारी काजू कारखान्याचे मुख्य प्रवर्तक रघुनाथ पाटील यांनी बैठकीत काजू उद्योग आणि  काजू उत्पादक शेतकरी याविषयी मौलिक मार्गदर्शन केले. अडकुर येथील सध्या  पुणेस्थित उद्योजक  डी के देसाई यांनीही बैठकीत फोनद्वारे सहभागी होऊन  शेतकरी काजू उत्पादक गट स्थापन करावा, काजुला GI मानांकनासाठी अर्ज करावा, काजू बँक तारण नियोजन करणे, शासकीय काजू फेडरेशन स्थापन करणे त्याचबरोबर स्थानिक काजू वानाला प्राधान्य द्यावे इत्यादी महत्वपूर्ण सुचना मांडल्या. बैठकीत यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. 

         परदेशी काजू सहज आणि कमी किमतीत कारखानदारांना उपलब्ध होत असल्याने इथल्या स्थानिक काजू उत्पादकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. इथल्या दर्जेदार आणि चविष्ट काजूला चांगला दर मिळेना झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत इथल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यायला हवा. त्या दृष्टीने या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी कोकण, गोवा व कोल्हापूरातील खासदारांना निवेदन देण्याचे या बैठकीत ठरवण्यात आले. जेणेकरुन इथे सहज उपलब्ध होणाऱ्या  बेचव परदेशी काजूवर निर्बंध येतील आणि  इथल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देता येईल. मागील वर्षी शेतकऱ्यांना चांगला दर देता येईल म्हणून काजू कारखानदारांनी महाराष्ट्र शासनाकडून GST परतावा घेतला मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांना याचा कोणताही लाभ झाला नाही यावर बैठकीत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. काजूला GI मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे , शिवाय काजू उत्पादक शेतकऱ्यांनी आपली काजू सहकारी संस्था स्थापन  करण्याविषयी सुचना शेतकऱ्यांनी मांडल्या.

           काजू क्षेत्राचा भौगोलिक समतोल राखून बळीराजा काजू दर संघर्ष समिती स्थापन करण्याचे या बैठकीत सर्वानुमते ठरले. समितीची दुसरी व्यापक बैठक येत्या रविवारी घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याचे ठरले. शेतकऱ्यांनी काजू योग्य आणि  शास्त्रीय पद्धतीने साठवावी , काजू विक्रीची घाई करू नये , या वर्षीच्या काजू  दराबाबत पुढील बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्याचे ठरले. बैठकीला काजू संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांबरोबरच चंदगड, आजरा, गडहिंग्लज व सिमाभागातुन काजू उत्पादक शेतकरी उपस्थित होते.यावेळी माजी सभापती  बबनराव देसाई, चंद्रशेखर गावडे,  नरेंद्र पाटील, एम के पाटील इत्यादीनी मार्गदर्शन केले. यावेळी  एस एन देसाई सोपानदेव, मा. खंडेराव देसाई, शैलेश नाईक,  बाबु रेडेकर, जनकु पाटील, श्रीकांत नेवगे, शिवराज देसाई, संतु रेडेकर , धोंडीबा रेडेकर त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात शेतकरी बैठकीला उपस्थित होते.  बैठकीला गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष  अभय देसाई  यांनी उपस्थिती लाऊन आंदोलनाला शुभेच्छा दिल्या.




No comments:

Post a Comment