हजारो शौकिनांच्या उपस्थितीत निट्टूर येथे रंगले कुस्ती मैदान, वाचा कोणी मारली बाजी, महिला कुस्त्या ठरल्या आकर्षण - चंदगड लाईव्ह न्युज

03 April 2022

हजारो शौकिनांच्या उपस्थितीत निट्टूर येथे रंगले कुस्ती मैदान, वाचा कोणी मारली बाजी, महिला कुस्त्या ठरल्या आकर्षण

 पै किरण दावणगिरी ने मारले निट्टूरचे कुस्ती मैदान, हजारो शौकिनांच्या उपस्थितीत सुबोध पाटीलला केले चितपट, महिला कुस्त्याही रंगल्या

कुस्ती स्पर्धेतील एक अटीतटीचा प्रसंग.


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

 ९२ वर्षांची परंपरा लाभलेल्या निट्टूर ता. चंदगड येथील कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत कर्नाटक केसरी पै किरण दावणगिरी यांने भोसले व्यायामशाळा सांगलीच्या सुबोध पाटीलला बाराव्या मिनिटात कलाजंग डावावर चितपट करत  उपस्थित सुमारे पाच हजार कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले. रंगतदार ठरलेल्या महिला कुस्तीत कडोली च्या सानिका ने राशिवडे तालीम च्या वृशाली हीला चितपट केले. 
प्रथम क्रमांकाची कुस्ती लावताना राजेश पाटील, भरमूअण्णा पाटील, विष्णू जोशीलकर (डावीकडे विजेता पैलवान किरण दावणगिरी)

   प्रथम क्रमांकाची कुस्ती आमदार राजेश पाटील, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, जि प सदस्य कल्लाप्पा भोगण, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर यांच्या हस्ते लावण्यात आली. पै अरुण बोंगाळे मोतीबाग तालीम व संगमेश बिराजदार मठपती आखाडा यांच्यातील यांच्यातील दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती बरोबरीत सुटली. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत शिवय्या पुजारी मठपती आखाडा याने शशिकांत भोंगार्डे बाणगे याला एकचाक डावावर चितपट केले. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत ऋषिकेश पाटील बानगे याने पवन चिकदिनकोप महावीर तालीम बेळगाव यास निकाली डावावर चितपट केले. जंगली मेंढ्या साठी लावण्यात आलेली पाचव्या क्रमांकाची कुस्ती पै रोहीत कंग्राळी विरुद्ध अभिषेक कापडे बाणगे यांच्यातील रटाळवाणी कुस्ती अखेर बरोबरीत सुटली. तर सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत बाबा रानगे मोतीबाग याने कीर्तिकुमार कारवे यास गुणावर पराभूत केले. 
महिला कुस्तीतील एक क्षण.

याशिवाय प्रेम कंग्राळी याने झोळी डावावर सुभाष निंगुरे मोतीबाग यास, पै विक्रम शिनोळी याने प्रकाश इंगळगी बेळगाव यास हप्ता डावावर, पवन भादीगिरी मोतीबाग याने संकल्प कंग्राळी वर तर पै हनुमंत इंगळी मोतीबाग याने कलाजंग डावावर रत्नाकर दावणगिरीवर नेत्रदीपक विजय मिळवले. अन्य कुस्त्यांत स्वप्नील पाटील मोतीबाग, कैलास पाटील, संभाजी पाटील निटूर, आकाश कापडे बानगे, ओमकार शिंदे राशिवडे, ओमकार लंबे बानगे, निलेश हिरगुरे बाणगे, संभाजी धुंदरे राशिवडे, अक्षय पाटील, विशाल पाटील, ओमकार शिंदे राशिवडे, ओमकार मुतगा, शुभम पाटील, रोहित पाटील, निखिल पाटील, सौरभ पाटील सर्व निटूर, जीवन कडोली, प्रतिक भोसले व निशांत पाटील राशिवडे, सोपान दळवी तुर्केवाडी या पैलवानांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवले.
मैदानावर कुस्ती शौकिनांची झालेली गर्दी.

 मैदानात सुमारे ७० वर कुस्त्या लावण्यात आल्या. महिला कुस्तीत स्वाती कडोली व पूजा राशिवडे यांच्यातील कुस्ती बरोबरीत सुटली. 
प्रथम क्रमांकाची कुस्ती जिंकल्यानंतर मान्यवरांकडून गदा स्वीकारताना किरण दावणगिरी.


 आखाडा पूजन भरमु उर्फ पोटू पाटील यांच्या हस्ते तर हनुमान प्रतिमापूजन नरसु पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा दीपक पाटील, एम जे पाटील, शंकर मनवाडकर, शंकर आंबेवाडकर, नामदेव पाटील, प्रतापराव चव्हाण पाटील अखिल भारतीय कुस्ती संघटना, महाराष्ट्र कुस्ती संघटना, येळ्ळूर, खानापूर, बेळगाव तालुका कुस्ती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कुस्ती समालोचन कृष्णा चौगुले राशिवडे यांनी केले. हनमंत घुले व सहकारी यांच्या रणहलगीने मैदानाची रंगत वाढवली. पंच म्हणून विष्णू जोशीलकर, गावडू पाटील, भैरु पाटील, नेत्रपाल हडलगेकर, भारत खवणेवाडकर आदींनी काम पाहिले. गोविंद पाटील, वाय व्ही कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.


No comments:

Post a Comment