जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे कोवाड व्यापारी संघटनेची नदीतील गाळ व अतिक्रमण काढण्याची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

22 April 2022

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे कोवाड व्यापारी संघटनेची नदीतील गाळ व अतिक्रमण काढण्याची मागणी

ताम्रपर्णी नदिपात्रातील गाळ काढण्यासंदर्भात जलसंपदा मंत्री यांना निवेदन देताना दयानंद सलाम व चंद्रकांत कुंभार

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

          कोवाड (ता. चंदगड) बाजारपेठ व कोवाड गावात ताम्रपर्णी नदीच्या उथळ व अतिक्रमीत झालेल्या पात्रामुळे उद्भवणाऱ्या पुर पुरस्थितीमुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे . त्यामुळे या नदिपात्रातील गाळ व अतिक्रमणे काढण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे निवेदन जलसंपदा मंत्री जयंत पाटील याना कोवाड व्यापारी संघटनेने आज दिले.

  चंदगड कार्यक्षेत्रातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या कोवाड बाजारपेठेला वारंवार पुर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. पुरामुळे वारंवार बाजारपेठ पाण्यामध्ये बुडत आहे. यामध्ये व्यापारी बांधवाना प्रचंड आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. गेली वीस - पंचवीस वर्षे ताम्रपर्णी नदीत बारमाही पाणी असल्यामुळे नदीच्या पात्रात खुप गाळ साचून नदीचे पात्र उथळ झालेले आहे. तसेच मानवनिर्मित अतिक्रमणसुद्धा या परिस्थितीला कारणीभूत आहे. यावरती उपाययोजना म्हणून माणगाव पुल ते कामेवाडी पुल या हद्दीत नदीपात्रात झालेली अतिक्रमणे काढणे व नदीपात्रात साचलेला गाळ काढून नदीपात्र पुर्ववत करण्यासाठी संबंधित विभागाकडून योग्य त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करुन कोवाड बाजारपेठ व कोवाड गावाला या महापूराच्या संकटातून वाचवण्यासाठी भरिव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली. कोवाड व्यापारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष दयानंद सलाम व चंद्रकांत कुंभार यांनी हे निवेदन जलसंपदा मंत्री जयंत पाटील याना दिले.

No comments:

Post a Comment