चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबीर विविध उपक्रमांनी भोगोली येथे संपन्न, वाचा कोणती केली कामे........ - चंदगड लाईव्ह न्युज

11 April 2022

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबीर विविध उपक्रमांनी भोगोली येथे संपन्न, वाचा कोणती केली कामे........

भोगोली (ता. चंदगड) येथे विशेष श्रमसंस्कार शिबीरात श्रमदान करताना चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयाचे एन. एस. एस. चे विद्यार्थ्यी. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर भोगोली (ता. चंदगड) येथे विविध प्रबोधनात्मक व श्रमदानाचे उपक्रम राबवून २२ ते २६ मार्च २०२२ या कालावधीत संपन्न झाले. 

       शिबीराचे उद्घाटन बी. ए. तळेकर सो (पोलिस निरिक्ष, पोलीस ठाणे, चंदगड) यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी पं. स. चंदगडचे सभापती अनंत कांबळे, भोगोलीच्या सरपंच सौ. शीतल गावडे, प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील, एस. आर. देशमुख, प्राचार्य आर.आय. पाटील यांची उपस्थिती होती. विद्यार्थी व ग्रामस्थांना कायद्याचे पालन व श्रम संस्काराचे महत्त्व समजावून दिले. 


         दि. 23/3/2022 रोजी प्रमुख वक्ते बी. आर. चिगरे (दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड) यांनी 'जगणे सुंदर आहे' या विषयावर स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. 24/3/2022 रोजी आरोग्य अधिकारी डॉ. स्नेहल मुसळे पाटील व प्रा.सरोजिनी दिवेकर यांनी 'महिलांचे आरोग्य आणि स्त्रियांच्या समस्या' या विषयावर मार्गदर्शन केले. 

25/3/2022 रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथील कृषितज्ञ सुरेश माने पाटील यांनी 'आधुनिक शेती तंत्र व अर्थ चक्र' या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. 

26/3/2022 रोजी  ॲड. आर. पी. बांदिवडेकर व ड. एस. एल. पाटील यांनी 'कायदेविषयक मार्गदर्शन' केले. 

27/3/2022 रोजी डॉ. प्रकाश साळुंखे, सहाय्यक व्यवस्थापक, गोकुळ दूध संघ, कोल्हापूर व डॉ.अनिल परगणे,  चंदगड यांनी 'पशु चिकित्सा, दुग्ध व्यवसाय व पशुधन काळजी' या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. याच दिवशी आयोजित केलेल्या पशु चिकित्सा शिबिरामध्ये 42 जनावरांची तपासणी करून घेऊन या शिबिराला शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. 

सायंकाळी 9.00 वाजता विविध गुणदर्शन  सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये ग्रामस्थ व स्वयंसेवकांनी विविध मनोरंजनाचे व प्रबोधनाचे कलाप्रकार सादर केले. ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद लाभला. 

          28/3/2022 रोजी या श्रमसंस्कार शिबिराचा सांगता समारंभ माजी रोहयो मंत्री भरमू आण्णा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील होते. 

या शिबिराचे प्रकल्प अधिकारी व कोल्हापूर जिल्हा समन्वयक प्राध्यापक संजय पाटील यांना शिवाजी विद्यापीठाचा व कोल्हापूर जिल्ह्याचा उत्कृष्ट प्रकल्प अधिकारी हा पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. 

भोगोली, रायाचीवाडी व काळगोंडवाडी या गावातील सर्व ग्रामस्थ, महिला, युवक व बालक यांचा शिबीर संपन्न करण्यास उत्तम प्रतिसाद मिळाला. शिवाजी विद्यापीठाचे संचालक अभय जायभाये यांनी शिबिराला सदिच्छा भेट देऊन कामाची पाहणी केली.

       शिबिरार्थींनी श्रमदानाच्या माध्यमातून ग्रामसफाई, गटार सफाई,रस्ते दुरुस्ती, अतिक्रमण हटविणे, वृक्ष संवर्धन, टाकीतील गाळ उपसा, वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्ती, जल व्यवस्थापन, प्रदूषण मुक्ती, श्रम प्रतिष्ठा, स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, सांस्कृतिक परंपरांचे जतन, योग-प्राणायाम इत्यादी उपक्रम यशस्वी केले व ग्रामस्थांमध्ये भरपूर परिवर्तन आणण्याचे सत्कार्य केले. 

पारंपारिक शिमगोत्सवाचाही आनंद लुटला. "माझी वसुंधरा व माझा गाव कोरोना मुक्त गाव" हे ब्रीद साकार करण्यात स्वयंसेवक यशस्वी झाले. दत्तक गावामध्ये एकही कोरोना रुग्ण सापडला नाही. शिबीर यशस्वीतेसाठी प्रकल्प अधिकारी, एन. एस. एस. समिती सदस्य, आजी-माजी स्वययंसेवक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक  व ग्रामस्थानी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment