किल्ले पारगडची पुन्हा भीषण पाणी टंचाईच्या दिशेने वाटचाल! पर्यटनाला खीळ, उपोषणाचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

01 April 2022

किल्ले पारगडची पुन्हा भीषण पाणी टंचाईच्या दिशेने वाटचाल! पर्यटनाला खीळ, उपोषणाचा इशारा

किल्ले पारगड


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
 किल्ले पारगड वर यावर्षी पुन्हा भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यामुळे पर्यटकांच्या संख्येवर विपरीत परिणाम होत आहे.
   चंदगड तालुक्याच्या पश्चिम टोकाला सह्याद्रीच्या कडेकपारीत वसलेल्या, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले पारगड वासियांच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाई सुरू झाली की जिप. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी येऊन आश्वासन देऊन जातात. दरवर्षी नवे अधिकारी, नवा सर्वे, नवी आश्वासने हे चक्र पस्तीस वर्षे सुरूच आहे. मात्र पारगडचा पाणी प्रश्न जैसे थे आहे. यावर गतवर्षी झालेल्या सर्वेनुसार २० एप्रिल पर्यंत प्रत्यक्षात काम सुरू न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार यांनी दिला आहे. 
 शिवकाळात बांधण्यात आलेल्या फाटक, गुंजन, गणेश, महादेव या तलावातील पाणी पूर्वी येथील रहिवाशांना वर्षभर पुरायचे. तथापि गेल्या पंधरा-वीस वर्षात रस्ता सुधारणेमुळे पर्यटकांची संख्या अनेक पटीने वाढली व पाणी अपुरे पडू लागले.  अलीकडे एप्रिलच्या सुरुवातीलाच  सर्व तलाव कोरडे पडत आहेत. परिणामी उन्हाळ्यात ग्रामस्थांवर अन्यत्र स्थलांतरित होण्याची नामुष्की ओढवत आहे. याचे सोयरसूतक ना लोकप्रतिनिधींना, ना जिप. पाणीपुरवठा विभागाला, ना महाराष्ट्र शासनाला.
 ऐतिहासिक वारसा लाभलेल्या किल्ल्याला पर्यटनाचा दर्जा मिळाला असला तरी तो आजतागायत कागदावरच आहे. मध्यंतरी काहींनी किल्ला सुधारणेसाठी 'दत्तक' घेतल्याची आवई उठवली पण घोषणेनंतर काडीचेही काम न करता ते बेपत्ता झाले. पारगड वासियांची तहान व अन्य समस्या सोडवता येत नसतील तर किल्ल्यासह पारगड गाव, इसापूर, नामखोल, मिरवेल ही पंचक्रोशीतील गावे सिंधुदुर्ग जिल्ह्यात घालावी. अशी उद्वेगजनक मागणी रघुवीर शेलार, प्रकाश चिरमुरे, विद्याधर बाणे, बुधाजी पवार, संतोष पवार, धोंडीबा बेर्डे आदी ग्रामस्थांनी केली आहे.
  दुसरीकडे वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्याअक्षम्य दुर्लक्ष व समन्वयाअभावी किल्ले पारगड ते मोर्ले, घोटगेवाडी रस्ता काम रखडले आहे. याप्रश्नी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी २८ आंदोलने करूनही प्रश्न रेंगाळतोय हे खेदजनक आहे. या प्रलंबित रस्ता व पाणी प्रश्नी २० एप्रिल पर्यंत कामाची सुरुवात न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा रघुवीर शेलार यांनी दिला आहे.


No comments:

Post a Comment