चंदगड महाविद्यालयामध्ये आयोजित लोकराजा स्टार्टअप व इनोवेशन फेस्टिीव्हलमध्ये बोलताना मान्यवर. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड- विदयार्थ्यांनी आत्मपरीक्षण करून आपल्या उज्वल भवितव्याचे नियोजन करावे. थोडीशी जोखीम पत्करून न रूळलेल्या वाटेवरून चालण्याचे साहस आवश्यक आहे. योग्य दृष्टीकोन बाळगला तर आपण नोकऱ्या मागणाऱ्याऐवजी नोकऱ्या देणारे होवू शकतो. हे लक्षात घ्यायला हवे. कोल्हापूर ही उदयोगधंदयास पोषक नगरी असून त्याचे श्रेय राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या द्रष्टेपणाला दयावे लागेल कल्पकता, साहस, तंत्रज्ञान, चिकाटी यांच्या बळावर आपण निश्चितच स्वावलंबी होवून सफल जीवन जगू शकतो. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एन. व्ही. शाह यांनी केले.
चंदगड येथील र.भा. माडखोलकर महाविद्यालयात आयोजित केलेला लोकराजा स्टार्टअप व इनोवेशन फेस्टिीव्हल मध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शंभराव्या पुण्यतिथी निमित्त कृतज्ञता पर्व म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय, शिवाजी विद्यापीठ आणि कौशल्य व उद्योजकता विकासकेंद्र र. भा. माडखोलकर महाविद्यालय आणि जिल्हाउदयोग केंद्राच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील हे होते.
यावेळी जिल्हा उदयोग केंद्राचे निरीक्षक संजय पाटील यांनी विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. तरूण उदयोजकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. युवकांनी विविध क्षेत्रातील संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या दोन्ही प्रेरणादायी व्याख्यानाना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य पी. आर. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी वर्तमान वास्तवाचे भान ठेवून नवे कौशल्य आणि तंत्रज्ञानाची कास धरून यशस्वी उदयोजक बनण्याचे आवाहन केले. योग्य दृष्टिकोनाचे महत्व सोदाहरण विषद केले.
प्रारंभी वृक्षाला जलार्पण करण्यात आले. प्रास्ताविक समन्वयक डॉ. एस. डी. गोरल यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा.ए. डी. कांबळे यांनी केले. आभार प्रा. डॉ. एम. एम. माने यांनी मानले. प्रा. आर व्ही आजरेकर, प्रा.व्ही. आर. कुंभार, प्रा. सचिन गावडे यांनी तंत्र सहाय्य केले. कार्यक्रमास प्राद्यापक, कर्मचारी यांच्यासह विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment