कोवाड केंद्र शाळेत गुढीपाडवा पट वाढवा उपक्रमांतर्गत नवागतांचे स्वागत व फॅशन शो चे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

02 April 2022

कोवाड केंद्र शाळेत गुढीपाडवा पट वाढवा उपक्रमांतर्गत नवागतांचे स्वागत व फॅशन शो चे आयोजन

कोवाड केंद्र शाळेत गुढीपाडवा पट वाढवा उपक्रमांतर्गत नवागतांचे स्वागत व फॅशन शोमध्ये सहभागी विद्यार्थ्यी.

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

        शासनाचा 'गुढीपाडवा पट वाढवा'  उपक्रम तसेच शाळा पूर्वतयारी अभियान अंतर्गत केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड (ता. चंदगड) येथे नवागत विद्यार्थ्यांची नोंदणी व स्वागत तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी फॅशन शोचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ अनिता कल्लाप्पा भोगण होत्या.

          कार्यक्रमाचे स्वागत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामा यादव यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील यांनी केले. सुरुवातीस केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद व शासनामार्फत मिळणाऱ्या विविध योजना व सुविधा, शाळा राबवत असलेले उपक्रम व वैशिष्ट्ये सांगणाऱ्या भव्य डिजिटल फलकाचे अनावरण सरपंच सौ अनिता भोगण यांच्या हस्ते करण्यात आले. तर मान्यवरांच्या हस्ते यंदा इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थी व पालकांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी दाखल पात्र ५१ मुलांपैकी  बहुतांशी मुले व पालक उपस्थित होते. यावेळी लहान बालकांच्या चेहऱ्यावरील उत्साह ओसंडून वाहत होता.               गुढीपाडवा व नवागतांचे स्वागत उपक्रमाचे औचित्य साधून शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. यात सर्व मुलांनी सहभाग घेत सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, महात्मा ज्योतिबा फुले, प्रभू श्रीराम, भगतसिंग, वारकरी, डॉक्टर, शेतकरी, सैनिक, पोलीस, राजर्षी शाहू अशा विविध वेशभूषा केल्या होत्या. नवागतांच्या स्वागतानंतर शालेय वाद्यपथकासह गाव व बाजारपेठेतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य इम्तियाज अल्लाखान, बापू व्हन्याळकर, संतोष सूर्यवंशी, परशराम जाधव, अध्यापक गणपती लोहार, श्रीकांत आप्पाजी पाटील, उज्वला नेसरकर, भावना अतवाडकर, मधुमती गावस, कविता पाटील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याकामी गटशिक्षणाधिकारी सौ. एस. एस. सुभेदार विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे केंद्रप्रमुख सुधीर मुतकेकर यांचे मार्गदर्शन तर जयवंत राजगोळकर, उमेश मुळीक, शहानुर मुल्ला आदी पालकांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment