आता ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही पदे होणार इतिहास जमा, पंचायत विकास अधिकारी हे नविन पद निर्माण होणार - चंदगड लाईव्ह न्युज

12 May 2022

आता ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही पदे होणार इतिहास जमा, पंचायत विकास अधिकारी हे नविन पद निर्माण होणार

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

               ग्रामपंचायत प्रशासनातील सर्वात महत्त्वाची असलेली ग्रामसेवक तसेच ग्रामविकास अधिकारी ही पदे आता भविष्यात आपल्याला पहायला मिळणार नाहीत. ती रद्दच केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्या अनुषंगाने पावले उचलली जात आहेत. ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही पदे रद्द करून पंचायत विकास अधिकारी हे एकच पद निर्माण करण्याची मागणी ग्रामसेवक संघटनेकडून होत होती. त्याला प्रतिसाद देत एक तज्ज्ञ समितीची नियुक्ती केल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकातून दिली आहे. त्यामुळे आता एकच पंचायत विकास अधिकारी हे पद निर्माण करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे दिसतेय. 

          ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीचे प्रशासकीय महत्वाचे पद आहे. त्याच ग्रामसेवक संघटनेने गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या प्रलंबित मंगण्यांसाठी संप, आंदोलन पुकारले होते. त्यात ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही पदे रद्द करून एकच पंचायत विकास अधिकारी हे पद निर्माण करावं अशी त्यांची प्रमुख मागणी होती. त्यानुसार राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ञ समिती नेमली असून या पदाच्या निर्मितीबाबत ही समिती अहवाल सादर करणार आहे. पगार, वेतन श्रेणी, पदोन्नती, आर्थिक गणना अशा अनेक बाजूंचा अभ्यास करून त्यानुसार पुढील कार्यवाही केली जात आहे. याचीच माहिती मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकातून दिली आहे. त्यामुळे आता ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही पदे रद्द होऊन एकच पंचायत विकास अधिकारी हे प्रशासकीय पद निर्माण होवू शकते.

No comments:

Post a Comment