कोवाडच्या कुस्ती मैदानात उदयराज पाटीलचा घुटना डावावर विक्रम शेटेवर विजय, ७० चटकदार कुस्त्यांनी शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले - चंदगड लाईव्ह न्युज

04 May 2022

कोवाडच्या कुस्ती मैदानात उदयराज पाटीलचा घुटना डावावर विक्रम शेटेवर विजय, ७० चटकदार कुस्त्यांनी शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले

कोवाड मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती लावताना आमदार राजेश पाटील भरमु अण्णा पाटील पैलवान विष्णू जोशीलकर महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आदी मान्यवर. (उजवीकडे विजेता मल्ल उदयराज पाटील)

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
मोतीबाग तालीम कोल्हापुर च्या पै उदयराज पाटील याने पै विक्रम शेटे इचलकरंजी याला घुटना डावावर चार मिनिटात चितपट करत कुस्ती शौकिनांची वाहवा मिळवली. बलभीम व्यायाम मंडळ कोवाड आयोजित निकाली कुस्ती मैदानातील या एक नंबरच्या कुस्ती बरोबरच ७० चटकदार कुस्त्यांनी शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले. ही कुस्ती आमदार राजेश पाटील, माजी रोहयो मंत्री भरमू अण्णा पाटील, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर व  नूतन महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली.
दुसऱ्या छायाचित्रात महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील  यांचा सत्कार करताना मान्यवर

  आखाड्याचे पूजन ओलम शुगर चे प्रमुख भरत कुंडल व सुधीर पाटील यांनी केले. फोटो पूजन बेळगाव चे माजी आमदार संजय पाटील व सुरेश घाटगे यांनी केले.  क्रमांक दोनच्या कुस्तीत प्रशांत जगताप महाराष्ट्र चॅम्पियन इचलकरंजी याने सरदार सावंत शाहू कुस्ती केंद्र यास दुहेरी पट काढत चितपट केले. क्रमांक तीनच्या कुस्तीत संगमेश बिराजदार कर्नाटक केसरी याने अक्षय शिंदे यास पराभूत केले. तर चार नंबरच्या कुस्तीत कोवाडच्या नॅशनल चॅम्पियन सागर राजगोळकर यांने दुहेरी पट काढत हणमंत गंधलवाले कर्नाटक चॅम्पियन याला दुहेरी पट काढत दोन मिनिटात चितपट केले. याशिवाय पै एकनाथ बेंद्रे शाहू कुस्ती केंद्र यांने किर्तिकुमार बेनके कारवे यास, विक्रम पाटील शिनोळी याने सुभाष निऊंगरे यास, शंकर चौगुले मोतीबाग याने मच्छीकोता डावावर प्रेम पाटील कंग्राळी यास, अतुल डावरे मोतीबाग याने अमर बंबरगा यास, तुषार जगताप इचलकरंजी याने निरंजन येळ्ळूर यास, अनिकेत हवालदार मोतीबाग याने सुशांत पाटील कंग्राळी यास, राजेंद्र पाटील शाहू आखाडा यांने विक्रम  तुर्केवाडी यास चितपट केले. या सर्व कुस्त्या प्रेक्षणीय ठरल्या. याशिवाय प्रथमेश पाटील कंग्राळी, यश जाधव, सुरज कडोली, राज शेळके मोतीबाग, आकाश पाटील निटूर, आदित्य पाटील निटूर, सौरभ पाटील तुर्केवाडी, प्रदीप जानभरे इचलकरंजी, रोहन पाटील निटूर, रवी पाटील तुर्केवाडी, सिद्धू दवाई तीर्थकुंडये, श्रीनिवास कडोली, वैष्णव कुद्रेमाणी, माणिक कारंडे मोतीबाग, सुमित कंग्राळी, श्रेयस व्हन्याळकर कोवाड, चंदन फडतारे इचलकरंजी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर प्रेक्षणिय विजय मिळवले. कुस्ती मैदानात नवे महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांनी उपस्थित राहून कुस्ती शौकिनांना अभिवादन केले. तीन वर्षांपूर्वी कोवाड मैदानात आपण खेळलेल्या कुस्तीचे अनुभव सांगितले.
  पंच म्हणून पै विष्णू जोशीलकर, राम पवार, लक्ष्मण पवार, लक्ष्मण भिंगुडे, देवजी पाटील, शंकर पाटील, तानाजी आडाव यांनी काम पाहिले. सुकुमार माळ इचलकरंजी यांनी धावते वर्णन केले.  सूत्रसंचालन रामा व्हन्याळकर यांनी केले. यावेळी रमेश रेडेकर, एम जे पाटील, शंकर मनवाडकर, सरपंच अनिता भोगण, अशोकराव देसाई, प्रा दीपक पाटील आदींची उपस्थिती होती.


No comments:

Post a Comment