संस्था निवडणुका, लगीनसराईत पेरणीपूर्व मशागतीचीही घाई, चंदगड तालुक्यातील चित्र - चंदगड लाईव्ह न्युज

20 May 2022

संस्था निवडणुका, लगीनसराईत पेरणीपूर्व मशागतीचीही घाई, चंदगड तालुक्यातील चित्र

बैलजोडी औतांच्या कमतरतेमुळे बळीराजा यांत्रिकी शेतीकडे वळला आहे.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          मे मधील सलगच्या मुहूर्तांमुळे सर्वत्र लगीन सराई सुरू आहे. आप्तस्वकीयांच्या लग्न, साखरपुड्यांत गुंतलेला शेतकरी वर्ग पावसाळा तोंडावर आल्यामुळे आता शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीकडे वळल्याचे चित्र चंदगड तालुक्याच्या पूर्वेकडील कर्यात भागात दिसत आहे.

        हा भाग पूर्वापार भात पिकाचे कोठार म्हणून ओळखला जात असला तरी गेल्या काही वर्षात परिसरात शिवसेना शासन काळात कृष्णा खोरे योजनेतून झालेल्या किटवाड मधील २, दिंडलकोप, तळगुळी, निट्टुर मधील २ अशा सहा-सात लघुपाटबंधारे तलाव तसेच ताम्रपर्णी नदीतील बारमाही पाण्यामुळे उसाचे पीक टेकड्या, डोंगर उतारावर ही प्रचंड प्रमाणात पसरले आहे. असे असले तरी भात पिकाखालील शिवारही बऱ्यापैकी आहे. अलीकडील काळात वारंवारच्या अवकाळी पावसामुळे आंतर मशागत कामांमध्ये व्यत्यय येत आहे. परिणामी पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत. तथापि यंदा मान्सून वेळेपूर्वी सुरू होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने लगिनसराई बरोबरच बहुतांशी गावांत सुरू असलेल्या दूध संस्था, विकास सेवा संस्थांच्या निवडणुकांतून वेळ काढत बळीराजा आता पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकण्यात गुंतला आहे. सध्या बैलजोड्यांची संख्या कमी झाल्यामुळे ट्रॅक्टर सारख्या यंत्रांच्या साह्याने शेती आंतर मशागत कामे करण्यावर भर दिसतो. तोंडावर आलेल्या भात पेरणी मुळे कर्यात भागातील बळीराजाच्या कुटुंबियांनी शिवार फुलला आहे.

No comments:

Post a Comment