चंदगड आगाराच्या नव्या वेळापत्रकामुळे 'एसटीचा बोजवारा' पूर्वीप्रमाणे गाड्या सोडण्याची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

20 May 2022

चंदगड आगाराच्या नव्या वेळापत्रकामुळे 'एसटीचा बोजवारा' पूर्वीप्रमाणे गाड्या सोडण्याची मागणीचंदगड : सी. एल. वृत्तसेवा

          दोन वर्षे कोरोनामुळे व त्यानंतर सहा महिने एसटी कामगारांच्या संपात डबघाईला आलेल्या एसटीला ऊर्जितावस्थेत आणण्याची संधी असताना रोज नवी वेळापत्रके काढून महामंडळ आणखी तोट्यात घालण्याचा प्रकार सुरू असल्याने याबाबत प्रवाशी वर्गातून नाराजी आहे.

         चंदगड आगाराकडून एसटीचे बदललेले मार्ग आणि वेळापत्रक याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. चंदगडच्या पूर्व भागातील राजगोळी, कुदनुर, कालकुंद्री, कोवाड भागात चंदगड, कोल्हापूर, बेळगाव हून येणाऱ्या गाड्या पूर्वीच्या मार्ग व वेळापत्रकाप्रमाणे सोडाव्यात अशी मागणी ग्रामपंचायत कोवाड, कालकुंद्री, कागणी, राजगोळी मार्फत करण्यात आली आहे. 

        पूर्व भागातील नागरिकांना अनेक कामांसाठी रोज चंदगड या तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. यासाठी नागरिक दिवसभर विविध बस, वडाप, खाजगी वाहनांनी चंदगडला जातात. पण सायंकाळी परतण्यासाठी असलेल्या कडलगे मार्गे कुदनुर, माणगाव मार्गे राजगोळी व डुक्करवाडी, मलतवाडी, कोवाड मार्गे कामेवाडी मुक्काम या तिन्ही गाड्या बंद केल्यामुळे सायंकाळी कोवाड, कुदनूर राजगोळी परिसरात यायचे कसे? हा यक्षप्रश्न आहे. 

        सकाळी नऊ वाजता साडेनऊ वाजता कुदनूर कडलगे मार्गे चंदगडला येणारी बस सध्या बंद असल्याने राजगोळी- चंदगड या एकाच बसवर ताण पडला आहे. अत्यावश्यक असलेली बेळगाव ते कोवाड मुक्काम गाडीही बंद आहे. प्रवाशांची मागणी असलेल्या मार्गावर बस न सोडता नको त्या मार्गावरून अवेळी गाड्या धावत आहेत. त्यातही चालक- वाहक प्रवाशांच्या सेवे ऐवजी केवळ ड्युटी करण्यात धन्यता मानत आहेत. यामुळे आगाराची अवस्था बुडत्याचा पाय खोलात अशी झाली आहे. अशा सर्व कारणांमुळे चंदगड आगाराचा तोटा आणखी वाढल्याची चर्चा रंगली आहे‌. चंदगड आगार व्यवस्थापक व वरिष्ठ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी इकडे लक्ष देऊन वेळापत्रक पूर्ववत करून प्रवाशांची गैरसोय टाळावी. अशी मागणी प्रवाशी व मार्गावरील ग्रामपंचायतींकडून करण्यात आली आहे.


        महामंडळाने अडकूर नजीक असलेल्या पेट्रोल पंपावरून डिझेल खरेदी करण्याचा ठेका घेतल्याने आगारातून सुटणाऱ्या व परत  येणाऱ्या सर्व गाड्या डिझेल भरण्यासाठी चंदगड पासून वीस किलोमीटर वरील पंपावरून  ये-जा करत आहेत. डिझेल दोन रुपये स्वस्त पडते म्हणून वीस किलोमीटरचा फेरा मारणे म्हणजे चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला अशी अवस्था झाली आहे.No comments:

Post a Comment