कडलगे येथील जळीतग्रस्त शेतकऱ्याला "आम्ही चंदगडी" ग्रुपची आर्थिक मदत - चंदगड लाईव्ह न्युज

19 May 2022

कडलगे येथील जळीतग्रस्त शेतकऱ्याला "आम्ही चंदगडी" ग्रुपची आर्थिक मदत

कडलगे खुर्द (ता. चंदगड) येथे जोतिबा पाटील यांना मदत देताना  "आम्ही चंदगडी" ग्रुपचे सदस्य.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

            कडलगे खुर्द (ता. चंदगड) येथे ९ मे रोजी जोतिबा रामु पाटील या शेतकऱ्याचे राहते घर आगीत जळून भस्मसात झाले. या आगीत  घराबरोरच जोतीबा पाटील यांच्या अख्ख्या संसाराचीच राखरांगोळी झाली. पाटील यांना सामाजिक भावनेतुन मदत करून जळालेल्या घराला पुन्हा उभ करण्यासाठी मदतीचा हात देण्यासाठी समाज माध्यमातून एक मोहीम हाती घेण्यात आली. त्यातून समाजातून मदतीचा ओघ सुरू झाला. त्यामध्ये 'आम्ही चंदगडी' या व्हॅटस्अप ग्रुपच्या माध्यमातून या ग्रुपच्या सदस्या विश्रांती पाटील- तुळसकर यांनी मदतीचे आवाहन करून ४० हजार २०३ रूपये आर्थिक मदत जमा केली. 

           समाज माध्यमाचा असाही चांगला वापर होवू शकतो हे या ग्रुपच्या सदस्यांनी दाखवून दिले आहे. चंदगड तालुक्यातील सर्वच चांगल्या गोष्टींना 'आम्ही चंदगडी' या व्हॅटस्अप ग्रुपच्या माध्यमातून कायमच पाठिंबा दिला जातो. त्यातून अनेकांना विविध प्रकाराची मदतही वेळोवेळी केली जाते. त्यात विशेष करून महिला सदस्यांकडून घेतला जाणारा पुढाकार आणि दिलेली मदत हे कौतुकास्पद आहे. अजूनही या ग्रुपच्या माध्यमातून मदतीचा ओघ सुरू आहे. ही जमा झालेली मदत ग्रुपच्या सदस्या उर्मिला दळवी, प्रियांका नांदवडेकर, वर्षा गावडे, शाम वांद्रे, ॲड. संतोष मळवीकर, सुधीर पाटील यांनी जळीतग्रस्त जोतिबा पाटील या शेतकरी कुंटूबाकडे जमा केली.

No comments:

Post a Comment