पारगड- मोर्ले घाटरस्ता प्रश्नी 'बांधकाम' ला टाळे ठोकणार! पारगड पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक - चंदगड लाईव्ह न्युज

09 May 2022

पारगड- मोर्ले घाटरस्ता प्रश्नी 'बांधकाम' ला टाळे ठोकणार! पारगड पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक

संग्रहित छायाचित्र

 चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 
गेली अनेक वर्षे रखडलेल्या किल्ले पारगड ते मोर्ले रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे होत असलेले दुर्लक्ष संतापजनक असून या रस्त्याचे काम तात्काळ सुरू न केल्यास बांधकाम विभागाच्या दोन्ही तालुक्यातील कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा पारगड व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते रघुवीर खंडोजी शेलार यांनी दिला आहे.
   
राज्य महामार्ग १३१ पैकी राज्य मार्ग १८७ किल्ले पारगड (ता. चंदगड) ते मोर्ले (ता. दोडामार्ग) हा रस्ता कोल्हापूर ते गोव्याला जोडणारा सर्वात सोपा व जवळचा मार्ग आहे. शिवसेना शासन काळात तत्कालीन रोहयोमंत्री भरमूआण्णा पाटील आदींच्या प्रयत्नातून जून १९९८ मध्ये या रस्त्याला मंजुरी मिळाली. प्रत्यक्षात २००५ मध्ये काम सुरू झाले असले तरी सतरा वर्षात काम पूर्ण होऊ शकले नाही. या काळात कोल्हापूर व सिंधुदुर्ग हद्दीतील ग्रामस्थांनी २८ वेळा आमरण उपोषण आंदोलने केली. मुदत संपल्यामुळे हे काम मागील वर्षी वनविभागाने रोखले. त्यानंतर पुन्हा आंदोलन व पंचक्रोशीतील जनरेट्यामुळे वन विभागाने रस्ता प्रकल्पात जाणाऱ्या २०.४२९ हेक्टर इतक्या जमिनीचे अधिग्रहण केले असून त्याची नोंद महाराष्ट्र शासन वन विभागाच्या ७/१२ वर आली आहे.  त्यातून कोल्हापूर हद्दीतील ३.७९४ व सिंधुदुर्ग १६.६३५  हेक्टर एवढ्या जाणाऱ्या जमिनी पोटी अन्य ठिकाणची जमीन प्रकल्प कामासाठी हस्तांतरित केली आहे. इतके होऊनही रस्ता कामाला गती नाही. यासाठी बांधकाम विभागाच्या सावंतवाडी कोल्हापुर कार्यालयांचा बेशिस्त, बेजबाबदार व निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी केला आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या किल्ल्याकडे येणारे पर्यटक व शिवप्रेमींच्या मार्गात या रखडलेल्या रस्ता कामाने खीळ बसली आहे. या रस्त्याबरोबरच सुरू झालेल्या अनेक घाट रस्त्यांची कामे कधीच पूर्ण झाली आहेत. मग हेच काम का रखडते? असा सवाल करत रस्त्याचे काम तात्काळ सुरू न केल्यास बांधकाम विभाग कार्यालयास टाळे ठोको आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. याची प्रत जिल्हाधिकारी कोल्हापूर व सिंधुदुर्ग, तहसीलदार चंदगड व दोडामार्ग, पोलीस स्टेशन चंदगड व दोडामार्ग यांना देण्यात आले आहे. तर एक निवेदन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना पाठवण्यात आले आहे.
    दरम्यान मार्गाचे काम जलदगतीने व दर्जेदार करावे. अशी मागणी कोल्हापूर, बेळगाव, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह गोवा राज्यातील पर्यटक व शिवप्रेमींनी केली आहे.


No comments:

Post a Comment