अखिल भारतीय कोळी समाजाचा सुवर्ण महोत्सव सुरतमध्ये , राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रमुख उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

10 May 2022

अखिल भारतीय कोळी समाजाचा सुवर्ण महोत्सव सुरतमध्ये , राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रमुख उपस्थिती


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
अखिल भारतीय आदिवासी कोळी समाज संघटनेचा सुवर्णमहोत्सव १४ व १५ मे , २०२२ रोजी गुजरातेतील सुरत येथे संपन्न होणार आहे. १४ मे रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक व १५ मे रोजी सुवर्ण महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . या कार्यक्रमास अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे माजी अध्यक्ष तथा सध्याचे  भारताचे महामहिम राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. यासह राष्ट्रीय अध्यक्ष अजितभाई पटेल व गुजरात , महाराष्ट्र , कर्नाटक , आंध्रप्रदेश , उत्तरप्रदेश , हिमाचल प्रदेश आदि राज्यातील कोळी समाजाचे आजी माजी मंत्री , आमदार व खासदार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष, प्रा बसवंत पाटील यांनी दिली.
 महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची सभा राज्याध्यक्ष परेशजी कांतिभाई कोळी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच ठाणे येथे पार पाडली . या बैठकीत सुवर्ण महोत्सवी  राष्ट्रीय अधिवेशनाबाबत व महाराष्ट्रातील ९ % आदिवासी लोकसंख्येपैकी OTSP मधील  ५% अनुसूचित जमातींना त्यांच्या लोकसंखेच्या प्रमाणात लोकसभा ,राज्य विधानसभा व आदिवासी सल्लागार परिषदेवर प्रतिनिधित्व न मिळणे , आदिवासी विकास निधी न मिळणे , कोळी महादेव ,टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व वैद्यता प्रमाणपत्र सुलभरीत्या न मिळणे , राजेंद्र मरसकोल्हे या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगावर केलेली नियुक्ती रद्द करणे आदि ज्वलंत समस्याबाबत चर्चा करण्यात आली. या प्रसंगी कार्याध्यक्ष सिध्दार्थजी कोळी , केंद्रीय कार्यकारिणी सदस्य महादेवबुवा शहाबाजकर , शंकरराव बटगेरी , मराठवाडा विभागीय अध्यक्ष व्यंकटजी मुद्दीराज आदी मान्यवर उपस्थित होते .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षानंतर सुरत येथे होणाऱ्या अधिवेशनाला कोल्हापूर ,सातारा , सांगली , सोलापूर , पुणे जिल्ह्यातून बहुसंख्येने आदिवासी महादेव कोळी , टोकरे कोळी , मल्हार कोळी  बांधवानी  उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे . दरम्यान कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यासाठी आदिवासी बांधवाची बैठक रविवार दि.१७ एप्रिल ,रोजी कसबा बावडा येथे आयोजित केली आहे या बैठकीस बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.


No comments:

Post a Comment