अंगावरील कपड्यांशिवाय काहीच उरले नाही! छप्पर जळून मोडले, अडीज तोळे सोने, ६० हजार रुपये रोख रक्कम अन् भाताची १२ पोतीही जळून खाक! कोठे? वाचा चंदगड लाईव्ह स्पेशल रिपोर्ट! - चंदगड लाईव्ह न्युज

10 May 2022

अंगावरील कपड्यांशिवाय काहीच उरले नाही! छप्पर जळून मोडले, अडीज तोळे सोने, ६० हजार रुपये रोख रक्कम अन् भाताची १२ पोतीही जळून खाक! कोठे? वाचा चंदगड लाईव्ह स्पेशल रिपोर्ट!


आगीमध्ये जळालेले घर

 कागणी / एस. एल. तारिहाळकर

कडलगे खुर्द (ता. चंदगड) येथे सोमवारी दि. ९ मन हेलावून टाकणारी घटना घडली. भूमीहिन शेतमजूर जोतिबा रामा पाटील यांचे कौलारू घर शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत भस्मसात झाले. अडीच तोळे सोन्याचे दागिने, ६० हजार रुपये रोख रक्कम, विकत घेतलेली भाताची १२ पोती, कपडे, साड्या जळून खाक झाल्या. आगीने संपूर्ण छप्पर जळून मोडल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. अंगावरील कपड्या शिवाय काहीच उरले नाही, असे गंभीर संकट त्यांच्यावर ओडवले आहे. 

तातडीने दहा हजार रुपये आर्थिक मदत करताना प्रा. दीपक पाटील

दोन लोखंडी कपाटेही पूर्णता जळून गेली आहेत. जोतिबा रामा पाटील व त्यांची पत्नी हे दोघे कार्वे येथे दवाखान्याला गेले होते. सोमवारी दुपारी  १२ च्या सुमारास अचानक पणे शॉर्टसर्किटने घराच्या पाठीमागील खोलीत आग लागली. माळ्यावर लाकडे होती. ती लाकडे पेटून पूर्ण छप्पर च जळून गेले. संपूर्ण खापऱ्या खाली पडून नुकसान झाले. सदर घटना कळताच तातडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रा. डॉक्टर दीपक पाटील यांनी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी तातडीने १० हजार रुपयांची मदत केली. त्याशिवाय गावातील शिक्षक एल पी पाटील यांनीही ५ हजार रुपये,  पांडुरंग पाटील यांनीही २ हजार रुपयांची मदत केली. त्यानंतर रात्रभर गावातील ग्रामस्थांनी आर्थिक मदतीचा हात दिला. सायंकाळी उशिरापर्यंत सुमारे 35 हजार रुपये अधिक रक्कम जमा करून पाटील कुटुंबीयांना देण्यात आली. 

आगी मध्ये जळून गेलेली भाताची पोती, लोखंडी कपाटे, छप्पर आदी.

जोतिबा पाटील हे शेतमजूर असून त्यांची दोन मुले परगावीच हातावर पोट भरत आहेत.  अचानक आलेल्या या संकटाने त्यांना मोठा धक्का बसला आहे. तातडीने त्यांच्या घरावर छप्पर घालून देण्यासाठी गावकरी एकजुटीने कामाला लागले आहेत. 

.....

पाटील कुटुंबीयांना सोमवारी रात्री उशिरापर्यंत 35000 हून अधिक आर्थिक मदत करण्यात आली.

घटना घडल्यानंतर दोन हजारांची मदत देताना पांडुरंग पाटील

यामध्ये शेतकरी संघटनेचे नेते प्रा. डॉ. दीपक पाटील यांनी 10 हजार, गावातील शिक्षक एल. पी. पाटील यांनी 5 हजार, भारतीय सैन्य दलाचे जवान कुमार शिवाजी पाटील यांनी 5 हजार रूपये, अभिजित जयराम पाटील व बंधू ढोलगरवाडी किराणा स्टोअर्स यांच्याकडून महिनाभर पुरेल इतके 5 हजार रुपयांचे धान्य व किराणा साहित्य मदत दिले.    पांडुरंग तुकाराम पाटील यांनी  2 हजार, पुंडलिक शंकर पाटील यांनी  500 रू., नारायण शंकर पाटील यांनी 500 रू., सुधा सुबराव पाटील (माहेरवाशीण, खा कोळीद्रे ) व धाकु गोविंद पाटील 700 रू., एन. एस. पाटील सर यांनी 500 रुपये, परशराम महादेव पाटील यांनी 500 रू.,  डॉ. अनिल गुंडू पाटील  यांनी 2 हजार रुपये, शिवाजी मारुती तुपारे(ढोलगरवाडी)  यांनी  2 हजार रुपये,  जयवंत गेनबा पाटील यांनी 200 रुपये, यल्लाप्पा कृष्णा पाटील यांनी 500 रुपये, सुनील सुबराव पाटील यांनी 1 हजार रुपये, अश्विनी पुंडलिक पाटील (नाना गावडे)  यांनी     1500 रुपये, लक्ष्मण महादेव पाटील यांनी 1 हजार रुपये, दौलत वैजनाथ पाटील यांनी 2 हजार रुपयांची मदत केली. 

या घटनेने पाटील कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा संसार रुळावर येण्यासाठी समाजातील दानशूरानी मदत करण्याची गरज आहे.











No comments:

Post a Comment