कालकुंद्री सेवा संस्था निवडणुकीत शेतकरी आघाडी चा दणदणीत विजय, आमदार गटाला केवळ एक जागा - चंदगड लाईव्ह न्युज

24 May 2022

कालकुंद्री सेवा संस्था निवडणुकीत शेतकरी आघाडी चा दणदणीत विजय, आमदार गटाला केवळ एक जागा

विजयानंतर पॅनेल प्रमुख, विजयी उमेदवार व समर्थक जल्लोष करताना.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
कर्यात भागातील मोठ्या असलेल्या कालकुंद्री, ता चंदगड येथील श्री कलमेश्वर विकास सेवा संस्थेच्या निवडणूकीत सरपंच संघटनेचे माजी अध्यक्ष एम जे पाटील व दौलतचे  माजी संचालक अशोक रामू पाटील यांच्या श्री कलमेश्वर शेतकरी विकास आघाडीने १३ पैकी १२ जागांवर विजय मिळवत अभूतपूर्व यश संपादन केले. आमदार राजेश पाटील समर्थकांच्या पॅनेलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.
   या निवडणुकीने कालकुंद्री तील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. अनेक नाराज आमदार गटात सामील झाल्यामुळे या गटाला विजयाची खात्री वाटत असली तरी मतदारांनी त्यांना झिडकारल्याचे स्पष्ट झाले आहे. याला अनेक तात्कालिक कारणे, घटना कारणीभूत ठरल्याची चर्चा गावात रंगली आहे. निवडणुकीत १३ जागांसाठी ४३ उमेदवार आपले नशीब अजमावत होते. तिरंगी लढतीत मोठी रस्सीखेच होती. चार-पाच अपक्ष उमेदवारांमुळे निवडणूक अधिकच रंगतदार ठरली होती.
     चंदगड सरपंच संघटनेचे माजी अध्यक्ष एम जे पाटील व दौलत चे माजी संचालक अशोक रामू पाटील पुरस्कृत कलमेश्वर शेतकरी विकास आघाडी- चिन्ह नारळ उमेदवारांना पडलेली मते ३०९ ते ३९६, आमदार राजेश पाटील यांना मानणाऱ्या शिवाजी कोकीतकर, सलीम मोमीन, विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामदैवत श्री कल्मेश्वर विकास पॅनल चिन्ह- कपबशी( उमेदवारांना पडलेली मते २०८ ते ३०७), श्री कलमेश्वर अखंड नाम सप्ताह कमिटी पुरस्कृत श्री कल्मेश्वर भक्त मंडळ पॅनेल चिन्ह- टेबल उमेदवारांनी घेतलेली मते ४० ते ९८, श्री कलमेश्वर शेतकरी सन्मान विकास आघाडी पुरस्कृत चार अपक्ष चिन्ह छत्री पडलेली मते २५ ते ६७. यात मतविभागणीचा फायदा विजयी पॅनेलला झाल्याचे विरोधकांचे मत असले तरी सरळ लढत असती तर आपण मोठ्या फरकाने विजय झालो असतो. असे एम जे पाटील व अशोक पाटील यांनी सांगितले.
 निवडणुकीत सर्वसाधारण कर्जदार खातेदार प्रतिनिधींच्या आठ जागांसाठी तब्बल २८ उमेदवार होते. यातील विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे अशोक रामू पाटील ३९६, अरविंद लक्ष्मण कोकितकर ३३६, परशुराम बाबू जोशी ३२२, प्रताप आनंदराव पाटील ३१५, विष्णू मारुती पाटील ३०८, संजय नारायण पाटील ३०९, हरिबा जोती पाटील ३०९ हे विजयी झाले असून आमदार गटाचे एकमेव उमेदवार विनोद अशोक पाटील यांनी ३०७ मते मिळवत निसटता विजय प्राप्त केला. अनुसूचित जाती जमाती गटातील एका जागेसाठी ४ उमेदवार रिंगणात होते यातील कल्लापा वसंत कांबळे ३१६ मतांनी विजयी झाले, महिला राखीव दोन जागांसाठी ६ उमेदवार रिंगणात होते यापैकी शोभा धोंडीबा पाटील ३५४ व सुरेखा मधुकर पाटील ३०९ या विजयी झाल्या, भटक्या- विमुक्त जाती/ जमाती गटातील एका जागेसाठी ३ उमेदवार उभे होते यात शिवाजी कृष्‍णा नाईक ३४४ मते घेत विजय झाले. तर इतर मागास गटातून एका जागेसाठी २ उमेदवारांत सरळ लढत होती. यात सुरेश दत्तू परीट  ३८३ मते घेऊन विजयी झाले तर मल्लाप्पा हनुमंत परीट यांना २९८ मते मिळाली. विशेष म्हणजे यातही ४६ मते बाद ठरली. क्रॉस मतदानाच्या प्रयत्नात प्रत्येक गटातील ३० ते ४६ मध्ये बाद ठरली. तालुक्यातील बहुतांशी सेवा संस्था निवडणुका बिनविरोध झाल्या असल्या तरी कालकुंद्रीतील निवडणूक बिनविरोध च्या अनेक प्रयत्नानंतरही लागलीच. यामुळे कौन कितने पानी में, याची झलक सहकार क्षेत्राला पाहायला मिळाली. अशी चर्चा कट्ट्यावरील गप्पांमध्ये रंगली होती. या निवडणुकीमुळे कालकुंद्रीत एम जे पाटील यांची राजकीय पकड अजूनही सैल झाली नाही याची प्रचिती आली. त्यांना यावेळी निवडणूक प्रतिष्ठेची करत अशोक पाटील यांची खंबीर साथ लाभली. यात उपसरपंच संभाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य विलास शेटजी, अझरुद्दीन शेख, भरमू पाटील आदींची साथ लाभली. विजय पॅनेलने निवडणूक निकाल लागताच गावात फटाके वाजवून जल्लोष केला.
 केंद्रीय प्राथमिक शाळा कालकुंद्री येथे दोन केंद्रावर मतदान व मतमोजणी पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनुराधा काटकर यांनी काम पाहिले. केंद्राध्यक्ष म्हणून मनोहर नारायण पाटील व शिवाजी पाटील तर मतदान अधिकारी म्हणून गणपती आवडण, उत्तम देसाई, नारायण बेळगावकर, दयानंद सावंत, धाकलू तुपारे, राजू भिंबर, रुक्माना पाटील तर झोनल ऑफिसर म्हणून शैलेश सावंत यांनी काम पाहिले.No comments:

Post a Comment